मुंबई - विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचं दिसून आले. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे मात्र मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या निकषावरून विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच २ अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे त्यामुळे विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीत आमदार नितेश राणे म्हणाले की, आम्ही लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करावेत. आदिवासी बांधवांना सूट द्या आणि २ अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या असे निकष योजनेत टाका. हा फक्त ट्रेलर आहे जेव्हा हिंदू समाज पूर्ण पिक्चर दाखवेल तेव्हा तुम्हाला तुमचा अब्बा आठवेल असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुस्लीम समाजाला टार्गेट केले.
तर नितेश राणे यांनी जी मागणी केली त्यात मुस्लीम समाजाला वगळावं असं म्हटलेले नाही. २ पेक्षा अधिक मुले असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळावं अशी मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातून ही मागणी पुढे येतेय, त्याबाबत पक्षातील आणि महायुतीचे नेते यावर योग्य तो निर्णय घेतील असं विधान शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केले.
दरम्यान, योजना धर्मावर चालत नाही. धर्मावर योजना चालवायच्या असेल तर जाहीर करावे. या लोकांना मस्ती आली आहे. ही धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंच्या कार्यक्रमात बोलावून देशातील एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे, लोकांनी असे बोलणं टाळावे असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नितेश राणेंसह भाजपावर टीका केली आहे. त्याशिवाय लाडकी बहीण योजना हा निवडणुकीसाठीचा जुमला होता. जशी पंतप्रधान सन्मान योजना सव्वा कोटी होती आता ८० लाखांवर आली तसेच लाडकी बहिण देखील होईल. छोट्या मोठ्या आमदारांकडून बोलून घेऊन जनतेची मानसिकता तयार केली जात आहेत असं ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटलं.