कोल्हापूर : विधानपरिषदेची उमेदवारी सतेज पाटील यांना मिळू नये, यासाठी आमदार महादेवराव महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मोट बांधली आहे. हे तिन्ही नेते एकत्रितपणे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पुन्हा मागणी करणार असून, त्यासाठी ते मुंबईला रवाना झाले. विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये कमालीचे शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. सतेज पाटील, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे या दिग्गजांनी उमेदवारीवर दावा सांगितल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. रविवारी सकाळी ‘गोकुळ’ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आमदार महाडिक, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यामध्ये इचलकरंजी नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांचा आपणाला पाठिंबा आहे, हातकणंगले व शिरोळ तालुक्यात सर्वाधिक मतदान असल्याने आपण सहज निवडून येऊ शकतो. यासाठी दोघांनीही आपले नाव घ्यावे, अशी मागणी प्रकाश आवाडे यांनी केली. विजयाचे संख्याबळ असल्याने उमेदवारी मिळाल्यास आपला विजय निश्चित असल्याचे आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले तर आपणही काँग्रेस श्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली आहे, असे पी. एन. पाटील यांनी सांगितल्याचे समजते. यावेळी खासदार धनंजय महाडिकही उपस्थित होते. सतेज पाटील सोडून तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादीची जागावाटपाची बैठक सोमवारी आहे. (प्रतिनिधी)विधानपरिषद निवडणूकमहादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे व आपण अशी तिघांची बैठक रविवारी सकाळी झाली. यामध्ये तिघांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव पक्षश्रेष्ठींकडे देण्याचा निर्णय झाला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व संसदीय मंडळाकडे तशी मागणी करणार आहे. - पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेसप्रकाश आवाडेंचा आग्रह : तिघांपैकी आपणाला उमेदवारी मिळाली तर बंडखोरी होणार नाही. त्यामुळे आपल्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठींकडे करा, असा आग्रह प्रकाश आवाडे यांनी आमदार महाडिक व पी. एन. पाटील यांच्याकडे केला. सोशल मीडियावर ‘महाडिकांची’ धूम : महाडिक यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीवर रविवारी दुपारी झळकले. त्यानंतर या वृत्ताचीच दिवसभर सोशल मीडियावर धूम सुरू होती.
सतेज पाटील सोडून कोणालाही उमेदवारी द्या
By admin | Published: November 30, 2015 12:54 AM