मुंबई : एखाद्या आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला असेल त्या आरोपीला त्याच्याविरुद्ध खटल्यात वापरली जाणारी सर्व कागदपत्रे मिळवण्याचा अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने विशेष सीबीआय न्यायालयाला शीना बोरा हत्येमधील आरोपी संजीव खन्ना याच्यासह सर्व आरोपींना श्यामवर रायच्या कबुलीजबाबाची प्रत तातडीने उपलब्ध करण्याचा आदेश दिला.सीबीआय या कबुलीजबाबावर अवलंबून नसल्याने विशेष सीबीआय न्यायालयाने रायचा कबुलीजबाब देण्यास नकार दिला. विशेष न्यायालयाचे हे निरीक्षण ‘अयोग्य’ असल्याचे न्या. जाधव यांनी म्हटले. ‘राय माफीचा साक्षीदार झाला आहे. साहजिकच सीबीआय केस लढवताना त्याच्या कबुलीजबाबाचा आधार घेणार. त्यामुळे तो कबुलीजबाब मिळवण्याचा अर्जदाराला अधिकार आहे,’ असे न्या. जाधव यांनी म्हटले. सीबीआयच्या वकील पुर्णिमा कंथारिया यांनी खन्नाला खटला सुरू होण्यापूर्वी म्हणजेच आरोप निश्चित करण्याच्या वेळी रायचा कबुलीजबाब देऊ, अशी माहिती उच्च न्यायालयाला दिली. ‘योग्य वेळी अर्जदाराला कबुलीजबाबाची प्रत दिली जाईल, तपास यंत्रणेची ही भूमिका अयोग्य आहे. ती मान्य करता येणार नाही. प्रत्येक आरोपीला त्याच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात येणारी कागदपत्रे मिळवण्याचा अधिकार आहे. आरोप निश्चितीच्या वेळी न्यायालय त्याला आरोप मान्य आहेत की नाही, अशी विचारणा करणार, त्या वेळी त्याला कशाच्या आधारावर आपल्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत, हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे सीबीआय व विशेष न्यायालयाने अर्जदाराला कबुलीजबाब न देण्याचे काही कारण नाही,’ असे म्हणत न्या. जाधव यांनी विशेष सीबीआय न्यायालयाने रायचा कबुलीजबाब संजीव खन्ना याच्यासह सर्व आरोपींना देण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
कबुलीजबाबाची प्रत द्या
By admin | Published: July 01, 2016 4:26 AM