ठाणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूककोंडीचा फटका ठाणे महापालिकेच्या मुंब्रा, दिव्यातील नगरसेवकांनाही बसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या महासभेत समोर आली. येथील काही नगरसेवकांना स्वत:ची वाहने असतानादेखील महासभेला पोहोचण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. त्यामुळे काहींनी रेल्वेने ठाणे गाठल्याने त्याचे पडसाद महासभेत उमटले. सुविधा नको, पण गरजेपुरता किमान रस्ता तरी द्या, नाहीतर पुढील महासभेत नाइलाजास्तव जमिनीवर बसून वरून आंदोलन करावे लागेल, असा घरचा आहेर शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी पुन्हा दिला.शुक्रवारच्या महासभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दशरथ पालांडे यांनी वागळे इस्टेट भागातील रोड नं. २२, ३३ आणि आजूबाजूच्या परिसरात मागील कित्येक वर्षांपासून होणाऱ्या वाहतूककोंडीच्या विषयाच्या बाबतीत लक्षवेधी मांडली होती. त्याला शिवसेनेचे गटनेते संतोष वडवले यांनी अनुमोदन दिले. या वेळी येथील भागात होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी येथील रस्त्यांचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी पालांडे यांनी केली. तर, येथील मंगळवारचा बाजार आणि फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी वडवले, एकता भोईर, विमल भोईर, विशाखा खताळ यांनी केली. दुसरीकडे शहरातील तीनहातनाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन, माजिवडा जंक्शन येथील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पालिकेने विविध प्रकारचे प्रस्ताव मंजूर करून घेतले. त्याचे पुढे काय झाले, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला. या वाहतूककोंडीमुळे शुक्रवारी एका मृतदेहाची देखील अडचण झाली. कळवा रुग्णालयात एक मृतदेह सकाळी ६ वाजता निघाले होते. परंतु, मुंब्य्रात तो दुपारी ३ वाजता आला.>मुख्य चौकात स्क्रीनद्वारे कोंडीची माहिती द्यावीयाच मुद्याला धरून त्यांनी शीळफाटा ते माणकोली असा कॉरिडोर आणि कोपरखैरणे ते माणकोली असा चार लेनचा रस्ता तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव पुढील महासभेत प्रशासनाने आणावा, अशी मागणीही केली. यापूर्वी विविध प्रकारच्या बायपास रस्त्यांची घोषणा झाली, मोबिलिटी प्लॅनही तयार झाला होता. त्याचे अद्यापही काहीच झालेले नसल्याची आठवण राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी प्रशासनाला करून दिली. मुंब्रा बायपासवर होणारी वाहतूककोंडी जेएनपीटीतून येणाऱ्या वाहनांमुळेच होत असून केवळ टोल चुकवण्यासाठी ती बायपासचा वापर करीत आहे. त्याचा फटका येथील नागरिकांना बसत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी केला. तर, ज्याज्या भागात वाहतूककोंडी होत असेल, त्यात्या भागांची माहिती शहरातील मुख्य चौकांमध्ये एक स्क्रीन उभारून त्या माध्यमातून दिल्यास वाहनचालकांनादेखील कोणत्या भागात वाहतूककोंडी आहे, याची माहिती मिळू शकेल. त्यानुसार, या स्क्रीन उभाराव्यात, अशी मागणी सभागृह नेत्या अनिता गौरी यांनी केली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या चर्चेनंतर प्रभारी पीठासीन अधिकारी राजेंद्र साप्ते यांनी मुंब्रासाठीचा रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढील महासभेत प्रशासनाने सादर करावा, असे आदेश दिले. तसेच शहरातील कोंडीची समस्या सोडवण्यासाठी तत्काळ ठामपा आयुक्त, पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम आदींची बैठक लावून यावर उपाययोजना करण्यासंदर्भात धोरण ठरवण्यात यावे, असेही आदेश त्यांनी दिले. >वाहतूककोंडीची हॅटट्रिकवरसावे पूल बंद झाल्याने ठाणे आणि आजूबाजूच्या शहरांत वाहतूककोंडीचे चित्र शुक्रवारीही पाहण्यास मिळाले. या कोंडीचे प्रमुख केंद्र तूर्तास तरी भिवंडी-माणकोली हेच असल्याचे दिसते. शहरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या कोंडीप्रमाणे शुक्रवारीही कोंडीने हॅट्ट्रिक केली. या कोंडीत रुग्णवाहिका अडकणार नाही, याची दक्षता वाहतूक विभागाकडून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.मुंबईतून अहमदाबाद येथे जाणारी असंख्य वाहने ठाण्यात येऊ लागली आहेत. त्यामुळे साहजिकच शहरात त्यांची संख्या वाढली आहे. तसेच भिवंडीतील गोदामांकडे जाणाऱ्या वाहनांनी माणकोली जंक्शन जॅम होत आहे. या वाहनांना वळण घेण्यास वेळ लागतो. ठाणे असो किंवा भिवंडी तसेच खारेगाव येथे वाहतूक थांबवल्याने मुंब्रा बायपास आणि शीळ डायघर हे चौकही जॅम होताना दिसतात. ठाणे-बेलापूर रस्त्यावरही अशीच परिस्थिती आहे. त्यातच शहरातही त्याचा परिणाम होत आहे. ही कोंडी वरसावे पूल दुरुस्त होऊन सुरू होईपर्यंत अशी राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
सुविधा नको किमान गरजेपुरता रस्ता द्या
By admin | Published: September 24, 2016 3:18 AM