लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कर्जबाजारी आणि शेतमालाला किंमत मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. यापूर्वी अशाच परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मी ७१ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले होते, परंतु सध्याच्या सरकारातील निर्णय घेणारे लोक हे देशातील १८ ते २० टक्के शेतकऱ्यांचा विचार करीत नाही. शेतमालाला एक तर किंमत द्या किंवा कर्जमाफी, अशी थेट भावना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सद्याच्या परिस्थितीबद्दल व्यक्त केली.शरद पवार यांच्या सुवर्ण महोत्सवी संसदीय कारकिर्दीचा गुणगौरव करण्यासाठी नाशिक येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि विश्वास सहकारी बँकेच्या वतीने रविवारी कार्यक्रम झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते नाशिककरांच्या वतीने पवार यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री विनायकदादा पाटील, आमदार हेमंत टकले, विठ्ठल मणियार, प्रतिष्ठानचे विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. पत्रकार अबंरिश मिश्र, सुधीर गाडगीळ व दत्ता बाळसराफ यांनी पवार यांची प्रकट मुलाखत घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मी निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या केंद्रातील एका व्यक्तीशी बोलल्यानंतर त्यांनी शेतकरी अठरा ते वीस टक्के आहे, दुसरीकडे ग्राहक ७८ ते ८० टक्के असून त्यांचा विचार करणे कधीही योग्यच असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सरकारची मानसिकता त्यातून स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मी कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्याच्या दुसऱ्याच वर्षी पीक कर्जाचे विक्रमी वाटप झालेच, परंतु अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने गहू आयात करणारा भारत गहू निर्यात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला. शेतकरी कधीही कर्ज थकवत नाही. पैसे बुडवणारी शेतकऱ्यांची जात नाही, सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल, असे वाटत नाही. त्यामुळे आता संघटित होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी शक्ती उभी करण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले.संसदेत महाराष्ट्राचे संख्याबळ वाढवू न शकल्याने देशाचे सर्वोच्च पद मिळवण्याचा विचार आपण डोक्यातून काढून टाकला आहे. देशात एकपक्षीय लोकशाही घातक असून, काँग्रेसने पर्याय देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
शेतमालाला किंमत द्या, नाही तर कर्जमाफी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 4:11 AM