शिर्डी : यंदा कमी पाऊस झाल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. राज्य सरकार त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेच, काही मदत लागलीच, तर महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदत करू, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पर्यटनाला चालना देण्यासाठी शिर्डीतील विमानसेवेचा विस्तार करण्याची घोषणाही त्यांनी केली.
साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी वर्षाची सांगता, शिर्डी संस्थानच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे राज्यात बांधल्या गेलेल्या अडीच लाख घरकुलांच्या चाव्यांचे वितरण अशा संयुक्त समारंभासाठी मोदी शिर्डीत आले होते. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारणमंत्री राम शिंदे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील लाभार्थ्यांशी आॅनलाइन संवाद साधत मोदी यांनी त्यांचा ई-गृहप्रवेशही केला. मोदी म्हणाले, दसऱ्यानिमित्त साईबाबांच्याभूमीत गरिबांना घराची भेट देता आली, याचा विशेष आनंद आहे. कोणत्याही योजनेत राजकीय स्वार्थ नसतो, तेव्हा ती योजना यशस्वी होते. पूर्वीच्या सरकारने अखेरच्या चार वर्षांत २५ लाख घरे बांधली, तर आम्ही चार वर्षांत सव्वा कोटी घरे बांधली.
पूर्वीच्या सरकारने अठरा तर आम्ही बारा महिन्यांत एक घर बांधले आहे. घराचा आकारही आम्ही वाढविला. त्याशिवाय घरासोबत वीज, पाणी, गॅस, शौचालय या सुविधाही दिल्या. आम्ही साफ नियतीने काम करतो.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान