कोल्हापूर : येळ्ळूरसारख्या वारंवार उद्भवणाऱ्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागासाठी स्वतंत्र पालकमंत्री द्या, अशी मागणी बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शहापूर विभागाच्या संयुक्त शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री चव्हाण यांची समितीच्या शिष्टमंडळाने विमानतळावर भेट घेतली. सीमाभागासाठी स्वतंत्र पालकमंत्री देण्यात यावा. हे पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील असतील, तर त्यांना भेटणे आम्हांला अधिक सोयीस्कर होईल. तसेच बेळगांव प्रश्नी न्यायालयात जो लढा सुरू आहे. त्यासाठी आपल्यातर्फे लढणाऱ्या वकीलांना आवश्यक ती माहिती राज्य सरकारकडून मिळण्याच्या दृष्टीने एका यंत्रणेची व्यवस्था करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. येळ्ळूरमधील मारहाण झालेल्या लोकांना लवकरात लवकर मदत मिळावी, खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटावे, अशा मागण्याही शिष्टमंडळाने केल्या. महाराष्ट्रातील सर्व खासदारांचे शिष्टमंडळ लवकरात लवकर पंतप्रधानांची भेट घेईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सीमाभागासाठी पालकमंत्री देण्याबाबत विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले. मारहाण झालेल्या लोकांना भेटण्यासाठी कोल्हापूरातील तीन मंत्र्यांना सांगितले आहे. ते लवकरच मारहाणीतील जखमींची भेट घेतली, असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. (प्रतिनिधी)
सीमा भागासाठी स्वतंत्र पालकमंत्री द्या
By admin | Published: August 04, 2014 3:21 AM