मुंबई : राज्यातील सरकारी व पालिका रुग्णालयांत डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची किती पदे रिक्त आहेत, हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करा, असे गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले. तसेच ही रिक्त पदे भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवा, असे निर्देशही दिले.न्यायालयाने एमपीएससीलाही वरिष्ठ डॉक्टर व विभागप्रमुखांसाठी आलेल्या प्रस्तावांवर जलदगतीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या पालिका रुग्णालयासंबंधी दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीत न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वरील निर्देश दिले.मालेगाव पालिका रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याचे याचिकेत नमूद आहे. सरकारने रिक्त पदे भरण्याची शिफारस केली असून एमपीएससीकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर राज्यातील सर्व सरकारी, पालिका रुग्णालयांत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाºयांची किती रिक्त पदे आहेत, याचे सर्वेक्षण करून आकडेवारी सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.पुढील सुनावणी १५ जूनला : ‘रिक्त पदे भरण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवा,’ असे निर्देश सरकारला देत न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १५ जून रोजी ठेवली.
‘सरकारी रुग्णालयांतील रिक्त जागांची माहिती द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 5:11 AM