मुंबई : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून त्यांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यातून ठाकरे कुटुंबीयांची माहिती वगळण्यात यावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेला अर्ज सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळला. जयदेव यांना त्यांच्या पद्धतीने केस मांडू द्या. त्यांनी कशी केस मांडायची, हे उद्धव ठाकरे यांनी ठरवू नये, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने उद्धव यांना फटकारले.जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या इच्छापत्राला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बाळासाहेबांचे आणि आपले घनिष्ठ संबंध होते. ‘मातोश्री’मधून बाहेर पडल्यानंतरही त्या संबंधांत फूट पडली नाही, असा दावा जयदेव यांनी केला आहे. त्यामुळे बाळासाहेब आपल्याला संपत्तीमधून मला वगळतील, हे अशक्य आहे. मृत्यूपूर्वी बाळासाहेबांच्या ढासळलेल्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा फायदा घेण्यात आल्याचा आरोपही जयदेव यांनी दाव्यात केला आहे.सोमवारच्या सुनावणीत उद्धव यांच्या वकिलांनी न्या. गौतम पटेल यांना जयदेव यांनी दाव्यात ठाकरे कुटुंबीयांबद्दल जे नमूद केले आहे, ते वगळावे, अशी विनंती केली. जयदेव यांनी दाव्यामध्ये ठाकरे घराण्याचा ‘इतिहास’ नमूद केला आहे, तो वगळण्यात यावा. १९९६ नंतर जयदेव यांनी ‘मातोश्री’ सोडले. त्यामुळे दाव्यात १९९६ नंतरच्या नमूद करण्यात आलेल्या बाबी केवळ ऐकीव असल्याने त्यांना ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी विनंती उद्धव यांच्या वकिलांनी न्या. पटेल यांना केली.जयदेव ठाकरे कुटुंबीयांचा महत्त्वाचा भाग होते, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना सगळ््या बाबी दाव्यात नमूद कराव्याच लागतील. त्यांना त्यांची केस सिद्ध करावीच लागेल. त्या घराविषयी आणि बाळासाहेबांविषयी त्यांना संपूर्ण माहिती होती, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना बाळासाहेबांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींपासून सर्व नमूद करावे लागेल. केवळ मी त्यांच्या जवळचा होतो, असे बोलून जमणार नाही. जयदेव यांना ते पुराव्यानिशी सिद्ध करावे लागेल. त्यांची केस त्यांनी कशी मांडावी, हे त्यांच्यावर अवलंबून आहे, ते उद्धव यांनी ठरवू नये, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने उद्धव यांचे म्हणणे फेटाळून लावले.दरम्यान, जयदेव यांनी सोमवारी उच्च न्यायालयात अतिरिक्त नऊ कागदपत्रे सादर केली. नऊपैकी केवळ दोन कागदपत्रे स्वीकारली गेली. जयदेव यांनी बाळासाहेबांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती मागण्यासाठी लीलावती रुग्णालयांच्या संचालकांना लिहिलेले पत्र व त्यावर लीलावती रुग्णालयाचे आलेले उत्तर ही कागदपत्रे न्यायालयाने स्वीकारली. उर्वरित कागदपत्रांचा आवश्यकता वाटेल, तेव्हाच विचार करण्यात येईल, असे न्या. पटेल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) २० जून रोजी निर्देश : लीलावती रुग्णालयाचे प्रतिनिधी, सामनाचे संपादक आणि अन्य काही वर्तमानपत्रांचे संपादक यांना साक्ष देण्यासाठी समन्स बजवावे, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली. त्यावर उच्च न्यायालयाने याबाबत २० जून रोजी निर्देश देऊ, असे स्पष्ट केले.
जयदेव ठाकरे यांना केस मांडू द्या
By admin | Published: April 19, 2016 3:50 AM