ठाणे : मी कोणाला ठार मारू शकत नाही, म्हणून मी स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या धोरणाचा भरवसा नसून ते कधीही बदलण्याची भीती माझ्या मनाला सतत बोचत आहे. मी स्वत:ला अपघातात संपविणार होतो. मात्र, तसे केले असते तर बिल्डरांच्या व्यथा समजल्या नसत्या. म्हणून, अखेर मी आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचे बिल्डर सुरज परमार यांनी आपल्या २० पानी चिठ्ठीत नमूद केले आहे.परमार प्रकरणात पोलिसांनी ठाणे सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात परमार यांनी लिहिलेले संपूर्ण पत्र समाविष्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी राजकारणी, सरकार यांच्याबद्दल नाराजी प्रकट करतानाच आपल्या व्यवसायात झालेल्या चुकांची कबुली त्यांनी दिली आहे.सरकारच्या प्रत्येक योजनेचा उद्देश हा थेट अर्थकारणाशी असून पैसे कसे उकळता येतील, याला जणू प्राधान्य दिले जाते. बिल्डरला बडा बकरा समजले जाते. जनमानसामध्ये आमची प्रतिमा चोर, अशी निर्माण करण्यात आली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला आहे. माझ्या गैरव्यवस्थापनामुळे मला कोणाला तोंड दाखवायची लाज वाटत होती. परंतु, आपल्या मुलांना सांग, तुमचे वडील फसवे नव्हते, असे परमार यांनी पत्नीला उद्देशून लिहिले आहे. इन्कम टॅक्स विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर मी माहिती द्यायला नको होती. मात्र, मी त्या वेळी प्रचंड दबावाखाली होतो, असे सांगत त्यांनी आपल्या भागीदारांची माफीदेखील मागितली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत केलेल्या घोडचुका, कायद्याचा व्यवस्थित अभ्यास न करता वकिलांनी दिलेला चुकीचा सल्ला, भिवंडी, पुणे आणि काव्या प्रकल्पासाठी टायटल क्लीअर नसताना केलेली जमीनखरेदी, भागीदारांनी मोठ्या विश्वासाने दिलेल्या पॉवर आॅफ अॅटर्नीचा केलेला गैरवापर व कॉसमॉसमध्ये झालेल्या सगळ्या गैरव्यवस्थापनास मीच एकटा जबाबदार असल्याची धक्कादायक कबुली त्यांनी या चिठ्ठीत दिल्याची माहिती आता उघड झाली आहे. मी स्वत:ला खूप स्मार्ट समजत होतो, परंतु मी मूर्खच निघालो, असा उल्लेख करताना आपण कशा प्रकारे चुका केल्या, त्याचा पाढाच त्यांनी या चिठ्ठीत वाचला आहे. माझे सहकारी आणि कुटुंबीयांचा माझ्यावर खूप विश्वास होता. परंतु, मी कंपनीचा कारभार योग्य प्रकारे सांभाळू शकलो नाही. त्यामुळे घरातील लग्नसोहळ्यासाठी आपल्या घरी पाहुणे येत असताना मी हे जग सोडून चाललोय. गेल्या दोन महिन्यांपासून मी दडपणाखाली होतो, असे परमार यांनी नमूद केले आहे.भिवंडीत काव्या आणि फायबर ग्लासचे प्रकल्प हाती घेतले, मात्र ते लालफितीच्या कारभारात रखडले. योगी प्रकल्पातली गुंतवणूक चुकीची ठरली. ज्वेलचा प्लॅन चेंज केल्यामुळेच त्याच्या परवानग्या रखडल्या. ती माझी घोडचूक होती, अन्यथा हा प्रकल्प मार्गी लागला असता. प्रकल्पांना ओसी मिळविण्यासाठी पाठपुरावा करत होतो. मात्र, काही ठिकाणी दंड तर काही ठिकाणी नियम आडवे येत असल्याने माझी कोंडी होत असल्याचा उल्लेख त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. भिवंडीत अरु ण पाटील यांच्या प्रकल्पात पुढे काही करू नकोस. तिथे गुंतविलेले पैसे विसरून जा, असा सल्लाही त्यांनी आपल्या मुलांना या चिठ्ठीत दिला आहे. (प्रतिनिधी)बिल्डर सुरज परमार आत्महत्येप्रकरणी सुरू झालेली सुनावणी अतिरिक्त वेळेअभावी १२ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकण्यात आली आहे. या वेळी परमारांनी बांधकामांसंदर्भात त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तसेच गोल्डन गँगही सिंगल बिझनेस मॅनला ब्लॅकमेल करी. त्याचबरोबर त्यांना फ्री बंगले मिळावेत, अशी मागणी झाली होती. मात्र, त्यांनी ते बंगले दिले नसल्याचे अशिलांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. परमार आत्महत्येप्रकरणी ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या चार नगरसेवकांपैकी विक्र ांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी न्यायामूर्ती व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात सुरू झाली.
अपघातात जीव देणार होतो! - सूरज परमार यांची पत्रात चुकांची कबुली
By admin | Published: February 05, 2016 2:51 AM