मुंबई : शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांना कर्जमाफी द्या, अशी मागणी महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मातंग समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आज महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या वतीने सोमवारी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे पक्षप्रमुख धनराज थोरात यांना सांगितले की, शेतकºयांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांना कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले, वसंतराव नाईक, संत रोहिदास चर्मकार आणि मौलाना आझाद या महामंडळांकडून घेतलेले कर्ज माफ करावे, अशी आमची मागणी आहे.यासोबत अण्णाभाऊ साठे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची नियोजित घाटकोपर येथील जागा बदलून पूर्वीपासून मागणी असलेली दादर येथील गोल्ड मोहर मिल येथील जमिनीवर स्मारक बांधावे, राज्यातील मातंग समाजाला १३ टक्के आरक्षणातून अ, ब, क, ड वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्यावे, गायरान जमीन अतिक्रमण धारकांना ७/१२ द्यावे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १० हजार झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करावे, मुंबई, ठाणे येथे स्थलांतरित झालेल्या बेघर भाडोत्री लोकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हक्काचे घर द्यावे आदी मागण्याही आंदोलकांनी यावेळी केल्या.
'शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांना कर्जमाफी द्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 3:34 AM