जालना : मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारी शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. परंतु, ‘अभिजात’ हा शब्द केवळ उच्चवर्णीयांमध्ये वापरला जाणारा आहे. राज्यात बहुजन समाज मोठ्या संख्येने असल्याने अभिजातऐवजी ‘बहुजात’ मराठी भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी प्रसिद्ध विचारवंत प्रा. जैमिनी कडू यांनी रविवारी येथे केली. येथील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात पहिल्या राज्यस्तरीय सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे येथील विचारवंत रमेश राक्षे होते. कडू म्हणाले की, संस्कृतमध्ये अभिजात म्हणजे ब्राह्मण. त्यामुळे केवळ साडेतीन टक्के लोकांसाठीच अभिजातया शब्दाचा आग्रह का? संस्कृत भाषेच्या एका विद्यापीठासाठी राज्य सरकार दरवर्षी ४० कोटींचा निधी खर्च करते. तेव्हा लोकभाषांसाठीही स्वतंत्र विद्यापीठ असायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. केंद्र आणि राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सरकार आले आहे. रा.स्व. संघाचे विचार विषारी असल्याचा आरोप करून कडू म्हणाले. राज्यात नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचे मारेकरी सरकारला सापडत नाहीत, हे दुर्दैव आहे. राज्यात पुरोगामी चळवळ, सत्यशोधक चळवळ आज अपयशी असल्याचे कारण या मानसिकतेच्या विचारांची व्होट बँक नाही, असेही कडू म्हणाले. (प्रतिनिधी)
मराठीला बहुजात भाषेचा दर्जा द्या
By admin | Published: March 02, 2015 1:25 AM