ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसेने सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्टेशनवर लोकल प्रवास करण्यासाठी गेलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली.
अविनाश जाधव यांनी रेल्वे स्थानकावरील पोलिसांना 5 मिनिटे प्रवास करण्याची विनंती केली. मात्र, पोलिसांनी ती नाकारली. पोलीस प्रशासनावर दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी यावेळी केला. या सविनय कायदेभंग आंदोनावेळी अविनाश जाधव, रविंद्र मोरे, महेश कदम, आशिष डोके, पुष्कर विचारे, अरुण घोसाळकर, विशाल घाग, राजेंद्र कांबळे यांना नौपाडा पोलिसांनी ठाणे स्टेशन येथून ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, मुंबईत मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला. यावेळी "सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करा, अशी विनंती अनेक वेळा सरकारला केली होती. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे आज नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत," अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
दरम्यान, मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. तर डोंबिवली स्थानकाबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सध्या लोकल प्रवास फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद आहे. त्यामुळे दररोज कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
'या' कर्मचाऱ्यांना सध्या लोकल प्रवास करण्याची परवानगी... १) सर्व रेल्वे कर्मचारी.२) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचार्यांसह मंत्रालयाचे सर्व कर्मचारी.३) महानगरपालिका शाळेतील शिक्षक व कंत्राटी कर्मचाऱ्यांसह सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी. (एमसीजीएम, एमबीएमसी, व्हीव्हीएमसी, टीएमसी, केडीएमसी, एनएमएमसी, पालघर मनपा) ४) महाराष्ट्र पोलिसांसह मुंबई पोलिस आणि जीआरपी.५) बेस्ट, एमएसआरटीसी, एमबीएमटी, व्हीव्हीएमटी, एनएमएमटी, टीएमटी, केडीएमटीचे कर्मचारी.६) केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी आणि केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी.७) संरक्षण, आयकर, जीएसटी, सीमा शुल्क, पोस्ट विभाग, न्यायपालिका व राजभवन आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी.८) राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी.९) सर्व पॅथॉलॉजिकल / लॅब टेस्टिंग / फार्मा कर्मचार्यांसह सर्व सरकारी / खासगी रुग्णालयाचे कर्मचारी.१०) एअर क्राफ्ट देखभाल व दुरुस्ती संस्थेचे कर्मचारी. (एमआरओ)११) सर्व खासगी वीज पुरवठा कंपन्यांचे कर्मचारी (अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, टाटा पॉवर कंपनी)१२) सर्व सहकारी बँका आणि खाजगी बँकांचे कर्मचारी.
आणखी बातम्या...
- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन
- योगी सरकारने लाँच केले 'कोविड अॅप', लॉग इन केल्यानंतर मिळणार कोरोना रिपोर्ट
- India Chine Faceoff : एलएसीवर तणाव सुरूच, दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक
- आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस