लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम डिसेंबर २०१७पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी या मार्गाचे नामकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग’ असे नाव देण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला. कोस्टल रोड बांधण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून दिले होते. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यामुळे हा प्रस्ताव लवकरात लवकर सुरू करण्याची शिवसेनेला घाई आहे. कोस्टल रोडचे काम लवकरच सुरू होणार असल्याने इतर कोणाच्या नावाची मागणी होण्याआधीच ‘छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांनी सभागृह नेते यशवंत जाधव यांच्याकडे एका पत्राद्वारे या नामकरणाची मागणी केली आहे. कीर्तिकर यांच्या मागणीनुसार यशवंत जाधव यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी आणला. या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत आज मंजुरी मिळाली.
‘कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या’
By admin | Published: July 11, 2017 5:53 AM