सातारा - देशात नुकतेच नवीन संसद भवन बांधले असून या संसद भवनाला विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली आहे. ही मागणी मान्य केलीच पाहिजे. मी सर्वसामान्य समाजातून पंतप्रधान झालो असं मोदी कायम म्हणतात. आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यादेखील मागासवर्गीयातून मोठ्या पदावर आले. त्याचे कारण म्हणजे संविधान. त्यामुळे बाबासाहेबांचे नाव नवीन संसद भवनाला द्यावे असं बिचुकले यांनी म्हटलं.
अभिजीत बिचुकले यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, संविधानाचे शिल्पकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्यामुळे नव्या संसद भवनाला द्यावे. यासाठी मी २ दिवसांची मुदत देतो. संविधान दिनी मोदींनी हा निर्णय घ्यावा. याबाबत मला लेखी कळवावे. नव्या संसद भवनाचे नामकरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संसद भवन, भारत असं व्हावे. हे तुम्हाला शक्य नसेल तर मी चैत्यभूमीवर ६ डिसेंबरला आंदोलन करेल असं त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्राला एकत्र ठेवण्याचे संविधान ज्या बाबासाहेबांनी दिले. त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नवीन संसद भवनाला तुम्ही देणार नसाल तर मी यापुढे जंतरमंतरवर जोपर्यंत संसद भवनाला नाव दिले जात नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे देशासाठी योग्य आहे असंही अभिजीत बिचुकले यांनी म्हटलं आहे.
२६ नोव्हेंबरला संविधान दिवस असताना अभिजीत बिचुकले यांनी केलेली मागणी चर्चेत आली आहे. राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नवीन संसद भवनाला देऊन देशाची प्रतिष्ठा वाढवावी. लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर तुम्ही पहिल्यांदा संसदेत गेला तेव्हा संसद पायरीवर डोके टेकवलेत. तुम्ही आमची मनं जिंकली. मी पंतप्रधानांचा मोठा चाहता आहे. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला. केवळ भारतीय राज्यघटनेमुळे हे शक्य झाले असंही बिचुकले यांनी म्हटलं आहे.