मुंबई - महाराष्ट्र सरकारने काजू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मनसे प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील विविध मुद्द्यांवर निवेदन देण्यात आली. त्यात कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांचाही मुद्दा होता.
राज ठाकरेंनी दिलेल्या पत्रात म्हटलंय की, काजू उत्पादक शेतकरी प्रचंड कष्ट करून आपल्या काजू बागायती फुलवतो. यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, निसर्गाचे बदलते वातावरण, वाढती मजुरी, पडलेला आंबा-काजू दर, उष्णता यामुळे पीक धोक्यात आले आहे. तरीही या सर्वांशी संघर्ष करत कोकणातला स्वाभिमानी शेतकरी उभा आहे. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर आली असल्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने काजू विक्री करणे आर्थिक तोट्याचे ठरत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच दापोली कृषी विद्यापीठाने काजू बी उत्पादन खर्च प्रतिकिलो १२२ रुपये ५० पैसे काढला आहे. परंतु कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही. ही वस्तूस्थिती आहे. सध्या कोकणामध्ये काजूचा दर प्रतिकिलो ११० रुपयांपर्यंत घसरला आहे. शेजारच्या गोवा राज्याने काजूला १५० रुपये हमीभाव दिला आहे. त्याप्रमाणे काजूला चांगला हमीभाव महाराष्ट्र सरकारने दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. काजू प्रक्रिया कारखानदार आणि व्यापारी यांची दर ठरवण्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शासनाने हमीभाव ठरवून द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.
दरम्यान, आयात केलेल्या काजू बी प्रक्रिया करून कोकणातील जी आय मानंकनाच्या नावाखाली तो खपवण्याचा प्रकार सुरू आहे. त्याला शासनाकडून आळा घातला जात नाही. त्यामुळे दर घसरणीवरून काजू उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काजू उत्पादनाचा हंगाम सुरू झाल्यावर हमी भाव मिळवून देण्याची लोकप्रतिनिधींना जाग येते. त्यामुळे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.