अरुण बारसकर । लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला असला तरी मार्चअखेर शिल्लक असलेल्या साखरेच्या विक्रीतून आलेल्या पैशाची वाटणीही शेतकऱ्यांना द्या, अशा नोटिसा साखर आयुक्तांनी राज्यातील १५० साखर कारखान्यांना बजावल्या आहेत. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार को-जनरेशन असलेल्या साखर कारखान्यान्याच्या त्या-त्या वर्षाच्या उत्पादनातून आलेल्या रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना व २५ टक्के रक्कम प्रशासनावर खर्च करावी तर को-जनरेशन नसलेल्या कारखान्यांनी ७० टक्के रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व ३० टक्के रक्कम प्रशासनावर खर्च करावी किंवा मागील वर्षीच्या गाळपाला पडलेल्या साखर उताऱ्यानुसार एफ.आर.पी. द्यावी असा नियम आहे. त्यानुसार बहुतेक साखर कारखाने एफ.आर.पी.ची रक्कमही देतात. परंतु मागील वर्षाची साखर शिल्लक ठेवून पुढील वर्षी अधिक दराने विक्री केली तर त्याचीही वाटणी (एफ.आर.पी.शिवाय) शेतकऱ्यांना दिली पाहिजे, असा कायदा आहे. या कायद्यानुसार साखर आयुक्तांनी राज्यातील १५० साखर कारखान्यांना २०१५-१६ च्या गाळपातून तयार झालेली साखर शिल्लक ठेवून २०१६-१७ मध्ये विक्री झालेल्या प्रमाणे उसाला दर देण्यात यावा अशा प्रकारची नोटीस दिली आहे. १५-१६ या वर्षांत साखरेला साधारण दोन हजार ४०० रुपयापर्यंत दर होता तर १६-१७ मध्ये साधारण ३४०० ते ३५०० रुपये साखरेला दर मिळाला. मागील वर्षीची साखर यावर्षी अधिक दराने विक्री केल्याने त्यातून आलेला अधिक पैसा यावर्षी गाळप झालेल्या ऊस उत्पादकांना देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिले आहेत. या नोटीसनंतर साखर संघाने ठराविक कारखानदारांची बैठक घेतली. या बैठकीत नियमात दुरुस्तीसाठी सहकार मंत्री व मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे निश्चित झाले. संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, आ. बाळासाहेब पाटील, आ. दिलीप वळसे-पाटील, माजी आ. हर्षवर्धन पाटील, राजन पाटील, रोहित पवार, संजय शिंदे, कल्याण काळे, अॅड. बी.बी. ठोंबरे आदींच्या उपस्थितीत हा निर्णय झाला. लोकनेतेला प्रति टन १० हजाराचा दरमोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याचे १६-१७ या वर्षीचे गाळप १४ हजार मे.टन. झाले होते. त्यांच्याकडे १५-१६ च्या शिल्लक असलेल्या साखरेला आलेल्या दराचा (३४०० ते ३५०० रु.) विचार करता १६-१७ मध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना प्रति टन १० हजार रुपयेचा दर द्यावा लागेल, असे नोटीस सांगते.
शिल्लक साखरेचा पैसा शेतकऱ्यांना द्या
By admin | Published: June 19, 2017 1:47 AM