ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - सरकारनं मराठा आणि धनगर आरक्षण कालबद्ध पद्धतीने द्यावं, अन्यथा जनक्षोभ वाढेल, असा इशाराच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. सत्ताबदल झाल्यामुळेच मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, असा आरोपही यावेळी नारायण राणेंनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते.
मोर्चा काढणा-या मराठा आणि धनगरांच्या भावना जाणून घ्या, सरकारनं मराठा आरक्षणावर ठरावीक कालावधीत निर्णय घ्यावा, असंही यावेळी नारायण राणे म्हणाले आहेत. काँग्रेसच्या काळात मराठा समाजाचे मुख्यमंत्री असले तरी त्यांनी केवळ आपल्या एकट्या समाजाचे हित पाहिले नाही, तर राज्यातील सर्व समाजाचे हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले.
ज्यांनी ज्यांनी आरक्षण मागितले, त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. इतर समाजांमध्ये मागासलेपण असल्यामुळे त्यांनी आरक्षण मागितलेले चालत असेल तर मग धनगर आणि मराठा समाजाने आरक्षण का मागू नये?, असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.