जालना – सर्व मराठा समाज एकवटलेला आहे. स्वत:च्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. गेल्या ७० वर्षात मराठ्यांची पोरं काही झाले तरी मोठं होऊ द्यायचे नाही असं षडयंत्र रचलं होते. परंतु सामान्य मराठ्यांनी एकजूट केली आणि सर्व षडयंत्र हाणून पाडले. आज मराठ्यांच्या मुलांना त्यांचे उद्ध्वस्त केलेले आयुष्य पुन्हा प्राप्त होऊ लागलंय. मग तो श्रीमंत, गरीब, शेतकरी सर्व मराठा समाजाचे कल्याण व्हायला लागले आहे. त्यामुळे आता आम्ही मागे हटत नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, २४ डिसेंबरपर्यंत आम्ही सरसकट आरक्षण मिळवणार. सरकारने कुणी कितीही उभे केले तरी समाजात फूट पडणार नाही. अखंड मराठा एकवटलेला आहे. समाजाची भूमिका प्रत्येक घरातील माणसाच्या हिताची भूमिका आहे. जो कुणी वेगळी भूमिका घेत असेल ती राजकीय आणि स्वत:च्या स्वार्थासाठी घेतोय. मी मराठा समाजाची सेवा करतोय. सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाल्याशिवाय थांबणार नाही. मी प्रामाणिकपणे सेवा करत राहणार. समाजातील शेवटच्या घटकांना आरक्षण मिळाल्याखेरीज आंदोलन थांबणार नाही आणि मीदेखील थांबणार नाही हा माझा शब्द आहे. मी सेवक म्हणून समाजाची सेवा करेन असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळेल. ५० टक्क्यांच्या आतमध्येच आरक्षण मिळेल. सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळेल हीच आमची भावना आहे त्याशिवाय माघार नाही. खूप मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळायला लागलेत. अनेक ठिकाणी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाचा आत्मविश्वास वाढला आहे. आमचा फोकस मराठा आरक्षणावर आहे. कुणी कितीही टीका केली तरी आम्ही लक्ष देणार नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होणार नाही. कुणालाही तेढ निर्माण करणे शक्य होणार नाही. मराठा समाज आरक्षण मिळवणारच आहे. कुणी काय केले हे २४ डिसेंबरनंतर आम्ही काढणार आहोत. आमच्या हक्काचे आरक्षण द्या, २४ डिसेंबरनंतर आम्ही सगळ्यांची नावे सांगणार आहोत असंही जरांगे पाटील यांनी सूचक विधान केले.
दरम्यान, सर्व मराठे सज्ज आहेत, उद्यापासून दौरा सुरू होणार आहे. प्रत्येक गावात उत्साह आहे. मराठा समाजाला इतकी वर्ष लढाई करून काही हाती लागले नव्हते, मात्र आता अनेक जिल्ह्यात नोंदी मिळत आहे. आता कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना आयुष्याची भाकरी मिळाली असं वाटायला लागली आहे. मराठ्यात प्रचंड उत्साह आहे. जिथे जिथे गाठीभेटी होतायेत तिथे तुफान गर्दी होतेय. समाजाच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू येत आहे. ३५ ते ४० टक्के समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.