Ambadas Danve, Winter Session Maharashtra: ४ वर्षांपूर्वी ग्रामविकास विभागातील भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पैसे भरले व ज्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली त्या विद्यार्थ्यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. २०१९ मध्ये १३ हजार ५२१ पदांसाठी ३४ जिल्हा परिषदांमध्ये जिल्ह्यात भरती प्रक्रिया घेण्यात आली. मात्र विविध कारणांनी भरती प्रक्रिया रेंगाळली. या भरतीसाठी परीक्षा शुल्कापोटी घेण्यात आलेले ३३ कोटी रुपये त्या-त्या विभागाकडे व ग्राम विकास विभागाकडे जमा झाले. मात्र ४ वर्षे झाली तरी विद्यार्थ्यांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे जे विद्यार्थी नव्याने परीक्षेसाठी अर्ज करतील, त्यांचे शुल्क न घेण्याची तरतूद करावी. यात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे, त्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क त्यांच्या खात्यात जमा करावे, अशी मागणी आज सभागृहात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडे केली.
परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्याबाबत शासन निर्णय झाला असून विविध माध्यमातून त्याची प्रसिद्धी केली जात असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रश्नावर सरकारकडून देण्यात आली.
गारपीट,अवकाळी नुकसानग्रस्तांनाही तातडीने मदत जाहीर करा
राज्यात मागील आठ दिवसांपासून निसर्गाचा कोप झाला आहे. यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणीही दानवे यांनी २८९ अनव्ये सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्याद्वारे केली. राज्यातील संभाजीनगर, जळगाव, पालघर, नागपूर, हिंगोली, नांदेड व नाशिक सह अनेक जिल्ह्यात मोठया प्रमाणात गारपीट व अवकाळीने थैमान घातले आहे. यामुळे द्राक्ष,कलिंगड, संत्री,मोसंबी, टोमॅटो व कापसाची बोंड भिजली आहेत. सरकारने १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, ती नेमकी कोणत्या नुकसानीसाठी केली याबाबत भूमिका स्पष्ट करावी, शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशी मागणी देखील दानवे यांनी आज सभागृहात लावून धरली.
उत्तर महाराष्ट्रात केळी व विदर्भात कापसाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असताना सरकारने त्यासाठी कोणतीही मदत जाहीर केली नसल्याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी भाव वाढीसाठी केलेल्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करावा अशी सूचनाही दानवे यांनी सरकारला केली.