शिवसेनेतून वेगळी चूल मांडणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्रीच दिल्लीत गेले आहेत. तेथे त्यांनी आज शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतली. काल कार्यकारीणीच्या नियुक्तीवेळीदेखील हे खासदार ऑनलाईन उपस्थित होते. यानंतर शिंदे गटाच्या या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.
उद्धव ठाकरेंना धक्का! शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
शिवसेना खासदार लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या वेगळ्या गटाचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले. यामध्ये विनायक राऊत यांच्याकडे गटनेतेपद आहे, ते राहुल शेवाळेंना आम्ही निवडले आहे. त्यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच आम्हाला शिवसेनेचे कार्यालय नको नवीन कार्यालय द्यावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी ही माहिती दिली आहे.
या खासदारांचा समावेशश्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
आमचीच मूळ शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर खासदारांची बैठक घेऊन आमचीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करतील व एनडीएमध्ये त्यांना अधिकृतपणे सामावून घेतले जाईल, असे मानले जात आहे. आमदारांच्या बंडाबाबतही त्यांनी हीच भूमिका घेतली होती. ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाणार आहे. त्याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देण्यात आले आहे. खासदारांनी वेगळी चूल मांडल्यामुळे ठाकरे गटास आता कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल.