मुंबई - प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे आपल्याला आव्हान नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. वचिंत बहुजन आघाडीला जनतेतून मिळत असलेला प्रतिसाद पाहून मला आनंदच होत आहे. परंतु त्यांच्या आघाडीचा फायदा शिवसेना-भाजपलाच होणार असा दावा केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी केला आहे. तसेच आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एमआयएमच्या साथीत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. तसेच अनेक ठिकाणचे उमेदवार देखील जाहीर केले. याविषयी आठवले यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी वंचित आघाडीचे आपल्याला आव्हान नसल्याचे म्हटले आहे.
यावेळी आठवले म्हणाले की, भाजप-शिवसेना युतीने महाराष्ट्रात एक तरी जागा सोडणे अपेक्षित होते. मी मुंबई उत्तर-पूर्व किंवा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून इच्छूक होतो. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्याशी बोललो होतो. पण त्याचा काही फायदा झाला नाही. सध्या तरी आपण एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही. परंतु आमचे मनोबल कायम राहण्यासाठी आम्हाला लोकसभेची एक तरी जागा द्यावी, असही आठवले यांनी म्हटले आहे.