दौंड : दौंड रेल्वे स्थानकाला आवश्यक असलेले दररोजचे ४० लाख लिटर पाणी (०.४ एमएलडी) उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे खात्याच्या बैठकीत पुणे येथे पाटबंधारे खात्याच्या कार्यालयात केली. दौंड रेल्वे स्थानकात पाणीपुरवठा बंद असून, जो काही पाणीपुरवठा आहे तो दूषित स्वरूपाचा आहे अशा तक्रारी प्रवासीवर्गातून पुढे आल्या आहे. दौंड हे जंक्शन स्टेशन असून, त्या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकात प्रवासी कामगार यांच्यासाठी सातत्याने सतत आणि शुद्ध पाणीपुरवठा होणे गरजेचे असेही या बैठकीत सुळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार दौंड रेल्वे स्थानकावर पाणी उपलब्ध होण्यासाठी पाटबंधारे आणि रेल्वे या दोन्ही विभागांच्या समन्वयातून तोडगा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यासंदर्भातील अहवाल तयार करणार असून, येत्या शुक्रवारी (दि.१०) रोजी प्राधिकरण पाहणी करून लवकरात लवकर अहवाल सादर करणार आहे. सन २०१० मधील मंजूर मागील प्रस्तावानुसार साडेतीन कोटींचा निधी दौंड रेल्वे स्थानकाच्या पाण्यासाठी उपलब्ध झाला होता, परंतु यावर पुढील कार्यवाही न झाल्याने हा निधी परत जात होता, सुळे यांनी यासाठी पाटबंधारे विभाग आणि रेल्वे यांच्यात बैठक घडवून आणली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आता पाटबंधारे विभागाने कालव्यातून पाणी रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचविण्यासाठी १० किलोमीटरची पाइपलाइन करण्याचा प्रस्ताव रेल्वेकडे मांडला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याबाबत अहवाल तयार करणार असून, हा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर लवकरच काम सुरू होईल. थेट कालव्यातून पाण्याचे नियोजन झाल्यास दौंड रेल्वे स्थानकाची दररोजची पाण्याची गरज पूर्ण होणार असून प्रवासी, रेल्वेत वापरण्यासाठी तसेच स्थानकावर आवश्यक पाणी पुरेसे उपलब्ध होणार आहे. दौंड स्थानकाची तहान यामुळे भागणार आहे. या बैठकीस सोलापूर विभागाचे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी के. आर. देवनाळे, नजीब मुल्ला, मीना पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता अतुल कपोले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे यमगर, वैशाली आवटे आदी उपस्थित होते. >केंद्र सरकारकडून दौंड रेल्वे स्थानकासाठी साडेतीन कोटींचा निधी याआधीच मंजूर झाला आहे. याबद्दल पुढील कार्यवाहीसाठी सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन पाटबंधारे आणि रेल्वे यांच्यासोबत बैठक घडवून आणली. पाटबंधारे विभागाने हे लागणारे पाणी थेट कालव्यातून रेल्वे विभागाने उचलावे, असा प्रस्ताव रेल्वेकडे दिला आहे. यामुळे दौंड स्थानकाला कायमस्वरूपी पाणी मिळू शकेल.
प्रतिदिनी ४० लाख लिटर रेल्वेला पाणी द्यावे
By admin | Published: June 09, 2016 1:56 AM