मुंबई : अनेकदा माता मुलांना दोन ते तीन महिन्यांचे झाल्यानंतर त्याला पाणी पाजतात किंवा मुलांच्या पोषणासाठी विकतचे दूध पाजतात. प्रत्यक्षात मात्र बाळांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध हाच पुरेसा आणि सकस आहार असतो. आईच्या दुधातून त्यांना आवश्यक ती पोषकतत्त्वे मिळतात आणि त्यांच्या वाढीस उपयुक्त ठरतात. पण, आईच्या दुधाशिवाय अन्य दूध दिल्यास त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो, असे कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. राजश्री कटके यांनी सांगितले. सहा महिन्यांहून अधिक काळ मातांनी स्तनपान केल्यास ते बाळाच्या आणि मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. जन्माला आल्यानंतरही पुढच्या सहा महिन्यांत बाळाची वाढ होत असते. या कालावधीत त्याला उत्तम पोषक तत्त्वांसाठी आईचे दूध पुरेसे असते. आईच्या दुधात कोलेस्टोन असते. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर बाळाच्या आतड्याची वाढ होण्यास हे महत्त्वाचे असते. लहानपणीच बाळाच्या आतड्याची वाढ चांगल्या पद्धतीने झाल्यास पुढे बाळाचे आरोग्य सुदृढ राहते. सध्या बहुतांश माता नोकरी करतात. त्यामुळे प्रसूतीनंतर काही महिन्यांतच त्यांना नोकरीला जावे लागते. अशावेळी मातांना बाळाला दूध कसे पाजायचे? असा प्रश्न पडतो. माता बाळांना विकतचे दूध पाजतात. पण, त्यापेक्षा मातांनी सकाळी जाताना दूध काढून फ्रीजमध्ये ठेवल्यास २४ तास ते चांगले राहते. बाळाला हे दूध अन्य घरातील व्यक्ती पाजू शकतात. त्यामुळे बाळाला दूध पाजायचे असेल तेव्हा थोडा वेळ आधी बाहेर काढून ठेवावे, असे डॉ. कटके यांनी सांगितले.
सहा महिन्यांपर्यंत आईचेच दूध द्या
By admin | Published: August 06, 2016 1:33 AM