अलिबाग : लाडक्या बहिणीला १५०० रुपये दिले जात आहेत मात्र, राज्यात ६४ हजार महिला बेपत्ता आहेत. जे सरकार महिलांची सुरक्षा करू शकत नाही, त्याच्या हाती पुन्हा राज्य द्यायचे की नाही, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे आवाहन शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी शनिवारी केले.
श्रीवर्धन मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांची प्रचारसभा म्हसळा येथे झाली. त्यावेळी पवार बोलत होते. “रायगडमध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यांना मंत्री केले, अन्य ठिकाणी संधी दिली. मात्र, त्यांना मतदारसंघाचा विकास करायचा नव्हता, तर स्वतःचा, मुलीचा, भावाचा विकास करायचा आहे”, असा टोलाही पवार यांनी लगावला.
येथील दिघी बंदर प्रकल्पामध्ये स्थानिकांना रोजगार मिळणार नसेल तर बंदराच्या कामाला हात लावू देणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला. श्रीवर्धनमधील निम्यापेक्षा जास्त तरुण मुंबई आणि आखाती देशात आपले गाव सोडून जात आहेत, ही चिंतेची बाब असल्याचे सांगत स्थानिक नेतृत्व रोजगार निर्मिती करण्यात अपयशी ठरल्याची टीका पवार यांनी केली.
या सभेला आल्यानंतर शरद पवार यांची बॅग तपासण्यात आली. त्याचीही चर्चा होती. दिघी बंदरात स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मी आता यावर अधिक बोलत नाही. मात्र, निवडणुकीनंतर बंदराच्या मालकाबरोबर चर्चा करू. स्थानिकांना काम देणार नसतील तर बंदराच्या कामाला हात लावू देणार नाही, असेही पवार म्हणाले.