मुंबई : गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता यासारख्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी सरकार आणि समाजसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून लोकचळवळ उभी करण्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील 'एमएमआरडीए'च्या मैदानात 'ग्लोबल सिटिझन' या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
'दी ग्लोबल एज्युकेशन अँण्ड लीडरशिप फाऊंडेशन' यांच्यातर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 'ग्लोबल सिटिझन इंडिया' या भारतीय शाखेतर्फे मुंबईतील कार्यक्रम होणार आहे. राज्य सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या सहकार्याव्यतिरिक्त अनेक संस्था या सहभागी होणार असून, 'लोकमत' वृत्तपत्रसमूह या महोत्सवाचा मराठीमधील 'मीडिया पार्टनर' आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्कनंतर महोत्सवाच्या आयोजनाचा मान मुंबईला मिळाला आहे. मुख्य महोत्सवाला जोडूनच स्वच्छ भारत, लैंगिक समानता या विषयांसह अन्य विषयांवर स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी परदेशातून आठ हजार तर देशातून २५ हजार लोक सहभागी होतील. विशेष म्हणजे, यातून पर्यटन व हॉस्पिटॅलिटी उद्योगाची सुमारे १३0 कोटी रुपयांची उलाढाल होईल.
2012
सालापासून ग्लोबल सिटिझनच्या व्यासपीठावरून २७ अब्ज अमेरिकेन डॉलर रकमेची कटिबद्धता जाहीर करण्यात आली आहे. याद्वारे होणार्या कामातून जगभरातील ७३ कोटी लोकांना लाभ होईल, अशी आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, बिग बी अमिताभ बच्चन, शाहरूख खान, आमीर खान, सचिन तेंडुलकर यांच्यासह राजकीय, सामाजिक, बॉलिवूड, क्रीडा, उद्योग जगतातील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.
2030
पर्यंत गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी दहा लाखांहून अधिक कृतीकल्पना मांडण्यात आल्या आहेत. यापैकी सामाजिक कार्यात पुढाकार घेणार्या ६0 हजार लोकांना महोत्सवासाठी नि:शुल्क तिकिटे देण्यात आली आहेत.
'कोल्ड प्ले' मुख्य आकर्षण
महोत्सवाचे मुख्य आकर्षण 'कोल्ड प्ले' आहे. आमीर खान, अर्जुन कपूर, ए.आर. रहेमान, अजिर्त सिंग, अंशुमन खुराणा, दिया मिर्झा, फरहान अख्तर, करिना कपूर-खान, मलायका अरोरा-खान, मोनाली ठाकूर, परिणिती चोप्रा, रणवीर सिंग, शाहरुख खान, श्रद्धा कपूर यांच्यासारख्या दिग्गजांची यावेळी उपस्थिती असेल.
जाणून घ्या 'कोल्डप्ले'बद्दल
'कोल्डप्ले' हा एक प्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँड आहे. पेक्टोराल्झ या नावाने १९९६ मध्ये या बँडची स्थापना झाली. त्यानंतर या बँडने स्टारफिश हे नाव धारण केले. १९९८ मध्ये या बँडने पुन्हा नाव बदलून 'कोल्डप्ले' नाव ठेवले. हा रॉक बँड आज जगभरात 'कोल्डप्ले' म्हणून ओळखला जातो.
२००० साली आलेल्या पॅराशूटस या पहिल्या अल्बममधील 'यलो' हे गाणे भरपूर गाजले या गाण्याने 'कोल्डप्ले'ला जगभरात नाव मिळवून दिले.
आज जगभरात कोल्डप्लेच्या गाण्यांना मागणी असून, २० वर्षाच्या करीयरमध्ये कोल्डप्लेचे ८ कोटी पेक्षा जास्त रेकॉडर्सची विक्री झाली आहे.
आठ ब्रिट पुरस्कार, पाच एमटीव्ही म्युझिक व्हिडीओ पुरस्कार, तीन वर्ल्ड म्युझिक पुरस्कार आणि सात ग्रॅमी पुरस्कार कोल्डप्ले रॉक बँडला मिळाले आहेत. रश ऑफ ब्लड टू द हेड या कोल्डप्लेच्या अलबमला २०१३ साली बीबीसीचा ऑल टाइम फेवरेटचा पुरस्कार मिळाला.