ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 22 - "लोकमत आयकॉन ऑफ सोलापूर"चा शानदार शुभारंभ हॉटेल बालाजी सरोवर येथे करण्यात आला. "लोकमत"समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भारत विकास ग्रुपचे चेअरमन हणमंत गायकवाड, सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, संपादक राजा माने, सहा सरव्यवस्थापक रमेश तावडे आदी मान्यवरांची उपस्थितीत "लोकमत आयकॉन ऑफ सोलापूर"चाशुभारंभ करण्यात आला.
लोकमत दैनिकाचा थक्क करणारा प्रवास वाखाणण्याजोगा आहे असे सांगत दरवर्षी लोकमतला 20 लाख कोटी किलोमीटर कागद छपाईसाठी लागतो, अशी माहिती यावेळी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी दिली. तसंच नेहमीच नकारात्मक बातम्या आल्या तर समाजातला पुरुषार्थ कमी होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. शिवाय, काही दिवसच प्रिंट मीडिया राहणार आता डिजिटल मीडिया येणार, असेही ते यावेळी म्हणाले.
माझं शिक्षण यवतमाळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर १९७४मध्ये लंडनहून सुवर्णपदक घेऊन भारतात आलो. कोणतेही काम छोटे नसते, अशी आठवणही यावेळी राजेंद्र दर्डा यांनी शेअर केली.
तुमच्यातील ताकद ओळखा आणि स्वतःसह 10 लोकांना मोठे करा. तसंच कोणतेही काम करायचे असेल तर टीम चांगली आणि विश्वासू लागते, असे यावेळी भारत विकास ग्रुपचे चेअरमन हणमंत गायकवाड यांनी भाषण करताना म्हटले.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे
- लोकमत हा माझा पेपर आहे. एखादा वर्तमानपत्राचा ग्रुप आणि मालक स्वतः लक्ष घालतो. व स्टाफ जोपर्यंत लक्ष घालत नाही तोपर्यंत ते दैनिक मोठे होत नाही.
- वर्तनमानपत्र चालवणे खूप कठीण आहे
- "आयकॉन 2" मधील बरेच चेहरे कष्टातून वर आले आहेत
- मराठी माणसात जिद्द असते मात्र त्यामध्ये कॉन्फिडन्स राहत नाही
दरम्यान, यावेळी सुशिलकुमार शिंदे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे कौतुक केले. विजयकुमार देशमुख यांच्यासारखा माणूस अभ्यास करतो. अनेकांच्या सुखदुःखात जातात. ते कष्ट करतात. ते कमी बोलतात आणि जेव्हा बोलतात तेव्हा बरोबर ठोकतात. सोलापूरची मातीच तशी आहे. सर्वांच्या सुखदुःखाला जातात म्हणून विजयकुमार देशमुख सातत्याने निवडून येत आहेत, अशा शब्दांत शिंदे यांनी विजयकुमार देशमुख यांचे कौतुक केले.