चला निवड करू या...आॅनलाइन मतदान : पवार, चांदगुडे, पठाण, बापटले, अडवाणी यांची नामांकने मुंबई : वैशिष्ट्यपूर्ण कामांतून महाराष्ट्राची सामाजिक गुढी उंचाविणाऱ्या चैत्राम पवार, कृष्णा चांदगुडे, रज्जाक पठाण, प्रा. रवी बापटले व डॉ. सुरेश अडवाणी या पाच मान्यवरांची नामांकने या वर्षीच्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कारासाठी ‘लोकसेवा-समाजसेवा’ या क्षेत्रातून जाहीर झाली आहेत. या मान्यवरांपैकी जनता व ज्युरी कोणाची निवड करणार याची उत्सुकता आहे. ‘लोकमत’च्या राज्यस्तरीय नेटवर्कच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगळी वाट धुंडाळत समाजबदल घडविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा या पुरस्कारासाठी शोध घेण्यात आला. प्रत्येकाचे काम वेगळे आणि नोंद घेणारे आहे. शिवाय समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे आहे. लोकमतसाठी हे पाचही विजेते आहेत म्हणूनच विविध शिफारशींमधून ही पाच नामांकने अंतिम फेरीसाठी निवडली गेली आहेत. या नामांकनावर ‘लोकमत’च्या संकेतस्थळावर आॅनलाइन मतदान सुरू आहे. चैत्राम पवार : नामांकन जाहीर झालेले धुळे जिल्ह्यातील चैत्राम पवार हे खऱ्या अर्थाने ‘जंगलमॅन’ आहेत. झाडांवर प्रेम करणाऱ्या या माणसाने धुळ्यातील बारीपाडानजीकच्या वन विभागाच्या जमिनीवर तब्बल अकराशे एकरचे जंगल उभे केले. जंगल, जल, जमीन, जन, जनावर ही पंचसूत्री त्यांनी आदिवासींमध्ये रुजवली. आदिवासींना स्ट्रॉबेरीसारख्या फळांचे उत्पादन घ्यायला शिकविले. कुऱ्हाडबंदीपासून पुरुषांच्या नसबंदीपर्यंतचा सामाजिक बदलाचा चमत्कार त्यांनी आदिवासींमध्ये घडविला. कृष्णा चांदगुडे : जात पंचायती हद्दपार करण्यासाठी चांदगुडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने राज्यभर लढा उभारला आहे. कायद्याला आव्हान देणारी ‘जात पंचायत’ नावाची समांतर यंत्रणा अनेक समाजात क्रूर रूप धारण करून उभी आहे. जातीचे नियम तोडले म्हणून माणसांना गावातून व जातीतून बहिष्कृत करण्याचे अघोरी निकाल या पंचायतींनी अनेक ठिकाणी दिले. पंचायतींच्या दहशतीतून अनेक ठिकाणी हत्यांकाडेही घडली. चांदगुडे यांनी उभारलेल्या लढ्यामुळे हे अन्यायी पंचायत राज हद्दपार होऊ पाहत आहे. वेगवेगळ्या ११ समाजांनी पंचायतींना मूठमाती दिली आहे. सरकारही आता लवकरच कायदा करणार आहे. रज्जाक पठाण : गेल्या चार पिढ्या पुणे जिल्ह्यात लोणी देवकर येथे देशी गायींचे संवर्धन करत आहेत. त्यांनी आपल्या गोठ्यात दररोज १२ लीटर दूध देणारी खिल्लार गाय तसेच २८ लीटर दूध देणाऱ्या गीर गायींची पैदास केली आहे. जातिवंत गायींची पैदास करून त्या गायी ते शेतकऱ्यांना दान करतात. भाकड देशी गायी दुभत्या बनवून त्यांनी शेतकऱ्यांच्या दावणीला बांधल्या. ६५० विधवा महिलांच्या मुलांना ते शिक्षणासाठी मदतही करतात. मुस्लीम गोपालक अशी त्यांची ओळख आजच्या काळातली नसून गेल्या तीन पिढ्यांची आहे. प्रा. रवी बापटले : ‘एचआयव्ही बाधितांचा पिता’ म्हणून बापटले राज्याला परिचित आहेत. एचआयव्हीमुळे दगावलेल्या दाम्पत्यांची एचआयव्ही बाधित मुले पुढे समाजात अनाथ व बहिष्कृत होऊन जगतात. या मुलांना कुणीही थारा देत नाही. त्यामुळे बापटले यांनी अशा मुलांसाठी लातूर जिल्ह्यातील हसेगाव येथे ‘सेवालय’ उभारले आहे. सध्या या सेवालयात ६२ मुलांचे ते पालकत्व करत आहेत. त्यांच्या या कामाला समाजातून मोठा विरोध झाला. मात्र, त्यांनी खंबीरपणे उभे राहत सरकारी अनुदानाशिवाय हे केंद्र चालविले. या मुलांसाठी ‘हॅपी इंडियन व्हिलेज’ (एचआयव्ही) नावाच्या प्रकल्पाची उभारणीही त्यांनी सुरू केली आहे. स्वत: अविवाहित राहून हा प्रपंच त्यांनी मोठा केला आहे. डॉ. सुरेश अडवाणी : भारतातील कॅन्सर संशोधनातील पथदर्शी म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे डॉ. सुरेश अडवाणी यांचेही नामांकन जाहीर झाले आहे. डॉ. अडवाणी हे स्वत: पोलिओग्रस्त आहेत. आजही ते चालू शकत नाहीत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात सुरुवातीला प्रवेशही नाकारण्यात आला होता. मात्र, व्यंगावर मात करत त्यांनी आपले जीवन कॅन्सरच्या संशोधनासाठी वाहिले. बोन मॅरोचे भारतातील पहिले प्रत्यारोपण त्यांनी केले. रक्ताच्या कॅन्सरशी झगडणाऱ्या बालकांवरील उपचाराची यशस्विता त्यांनी ७० टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. पारोमिता गोस्वामींचा गौरवयापूर्वी ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’मध्ये ‘लोकसेवा-समाजसेवा’ या क्षेत्रातून पारोमिता गोस्वामी यांना गौरविण्यात आलेले आहे. मूळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या गोस्वामी या चंद्रपूर, गडचिरोलीत आदिवासींसाठी काम करतात. श्रमिक एल्गार नावाचे आंदोलन त्यांनी उभारले. चंद्रपूर जिल्हा दारूमुक्त करण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारला. हा लढा राज्यभर गाजला.
‘लोक’मतातून लोकसेवकांचा गौरव
By admin | Published: March 25, 2016 2:27 AM