पुणे : खरं तर त्यांचे त्या मुक्या जिवाशी कोणतंच नातं नाही..आहे तो केवळ माणुसकीचा धर्म. आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा यातून एक अनोखा बंध त्यांच्यात निर्माण झाला आहे. कॅन्सर सर्जन असलेले डॉ. रवी कसबेकर यांनी भटक्या कुत्र्यांसाठी सासवड येथे शेल्टर उभारून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले आहे. ‘लोकमत’चे प्रोफेशनल आयकॉन्स ठरलेल्या डॉ. कसबेकर यांना त्यांच्या या योगदानासाठी पूना राऊंड टेबल १५ च्या वतीने खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते अडीच लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. एक वेगळी वाट निवडून त्यांनी जे काम उभे केले आहे त्याला सर्वांनीच सलाम केला. एकीकडे रस्त्यावरच्या भटक्या कुत्रांना मारून टाकण्याची भाषा केली जात असताना डॉ. कसबेकर यांच्यासारखा ‘मसिहा’ त्यांचा तारणहार बनून त्यांचे संगोपन करीत आहे, हेच त्यांच्या कार्याचे वेगळेपण आहे. व्यवसायाने ते कॅन्सर सर्जन आहेत, बाणेरला त्यांचे क्लिनिक आहे, रात्री ११ वाजता ओपीडी संपल्यावर, ते रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना रोटी, बिस्किटे असे पदार्थ खायला घालायला निघतात. रात्री दोन वाजेपर्यंत त्यांचा हा प्रवास सुरू असतो. या त्यांच्या दिनक्रमात कधीही खंड पडला नाही. सासवडला त्यांनी भटक्या कु त्र्यांसाठी १० हजार स्क्वेअर फुटांचे शेल्टर उभारून एक आगळेवेगळे आणि आदर्शवत असे काम समाजात उभे केले आहे. या कामासाठी कुणाकडून एक पैसाही न घेता स्वखर्चाने गेल्या अनेक वर्षांपासून या भटक्या कुत्र्यांचे पालनपोषण ते करीत आहेत. याच त्यांच्या कार्याला मदत करण्याच्या हेतूने त्यांना पूना राऊंड टेबल १५ च्या वतीने धनादेश देण्यात आला असल्याचे प्रशांत बंब यांनी सांगितले.
मुक्या जिवांसाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव
By admin | Published: June 27, 2016 1:14 AM