मुंबई : भाजपाचे मुंबईतील आमदार राज पुरोहित यांना त्यांच्या वक्तव्यामुळे आज विरोधी पक्षांच्या आणि विशेषत: महिला आमदारांच्या तीव्र रोषाचा विधानसभेत सामना करावा लागला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर आरोप केल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. विरोधी सदस्य एकेक करून सभागृहाबाहेर जात असताना ‘जाना है तो जाओ, चलो जाओ’असे उद्गार पुरोहित यांनी काढले. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर त्यावर चांगल्याच संतापल्या. पुरोहित यांनी एका महिला आमदाराचा अपमान केला आहे, असे सांगत ठाकूर, अमिता चव्हाण, प्रणिती शिंदे, सुमन पाटील पुढे सरसावल्या. पुरोहित यांनी माफी मागावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक होून पुढे आले. वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुरोहित यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. महिला आमदारांचा अपमान करण्याचा पुरोहित यांचाहेतू नव्हता, त्यांनी कोणाचेहीनाव घेतलेले नव्हते, असा बचाव वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला. त्यावर, पुरोहित यांचे वक्तव्य तपासून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे तालिका अध्यक्षांनी सांगितले.
जाना है तो जाओ... वक्तव्य भोवले, महिला आमदारांचा राज पुरोहितांवर रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 1:42 AM