- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 27 - तक्रार नोंदविण्यासाठी घेतलेल्या ५.५ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात गोव्याचे पोलीस महानरिक्षक आयपीएस अधिकारी सुनिल गर्ग यांच्याविरुद्धच्या तक्रारीची दखल घेऊन गोवा लोकायुक्ताने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
फसवणूक प्रकरणात तक्रार नोंदवून घेण्यासाठी ५.५ लाख रुपये लाच मागण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवूनही या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात न आल्यामुळे तक्रारदार मुन्नाभाई हलवाई यांनी लोकायुक्ताकडे तक्रार नोंदविली होती. लोकायुक्ताने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती लोकायुक्ताच्या सूत्रांकडून देण्यात आली. या प्रकरणात १ सप्टेंबर रोजी तक्रारदार मुन्नालाल यांना लोकायुक्ताकडून बोलावण्यात आले आहे. कोणत्याही प्रकरणाचा तपास हा तक्रारदाराच्या तक्रारीपासून होत असतो, तसेच तक्रार नोंदविल्यानंतरही माहिती देण्यासाठी तक्रारदारालाच पूर्वी पाचारण केले जाते. लोकायुक्ताकडून तक्रादाराला बोलावल्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला हात घातल्याचे ते संकेत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
महानिरीक्षक यांनी तक्रारदाराकडे एफआयआर नोंदविण्यासाठी ५.५० लाख रुपये घेतले होते. या संबंधीचे रेकॉर्डिंगही तक्रारदाराने केले होते. त्यात पैसे मिळाल्याची कबुली देणारे संवाद आहेत. संवादातील आवाजही गर्ग यांच्या आवाजाशी मिळता जुळता आहे. या रेकॉर्डिंगची सीडीही तक्रारदाराने लोकायुक्ताला सादर केली आहे.
दरम्यान या प्रकरणाचा मुख्य सचिवांकडून तपास होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते. प्रत्यक्षात मुख्य सचिवांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेलाच नाही.