ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १८ - गोव्यातील एक आमदार व ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णू वाघ यांच्या प्रकृतीत गेले तीन दिवस सुधारणा होत नसल्यामुळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे काहीसे संचित बनले आहेत. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळास (गोमेकॉ) भेट दिली व तिथे उच्चस्तरीय बैठक घेऊन वाघ यांच्या आरोग्याच्या स्थितीचा आढावा घेतला.
हृदय, मूत्रपिंड, यकृत आदी भागांशीसंबंधित जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यांचा समावेश या बैठकीत होता. शिवाय मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव, आरोग्य सचिव डॉ. सचिन शिंदे यांनीही बैठकीत भाग घेतला. वाघ यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही बोलविण्यात आले होते. वाघ हे गोमेकॉ इस्पितळात गेले तीन दिवस वेन्टीलेटरवर आहेत. त्यांना गेल्या मे महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे गोमेकॉ इस्पितळात त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा चार दिवसांपूर्वी त्यांच्या छातीत कळा येऊ लागल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. त्यांचा रक्तदाब दोनशे झाला होता. तो खाली आणण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी दोन दिवस केला. गेल्या तीन दिवसांत वाघ यांच्या प्रकृतीत मोठीशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे गोव्याबाहेरून तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवावे की वाघ यांनाच अन्यत्र कुठल्या इस्पितळात हलवावे या दृष्टीकोनातून मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉच्या डॉक्टरांशी गुरुवारी चर्चा केली.
मुख्यमंत्री बुधवारी दिल्लीत होते. गुरुवारी सकाळी ते गोव्यात परतले व थेट गोमेकॉ इस्पितळात गेले. आपले वाघ यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी सातत्याने बोलणो सुरू आहे, असे मुख्यमंत्र्यांनी लोकमतला सांगितले.
(खास प्रतिनिधी)