ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २३ - संततधार पावसाने गोव्यालाही झोडपून काढले असून ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडीचे प्रकार घडले आहेत. क्षणाचीही उसंत न घेता कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही काही भागात मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता हवामान वेधशाळेने व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईहून येणाया बसगाड्याही सकाळी गोव्यात पोचू शकल्या नसून मध्येच अडकल्या आहेत.
येथील वेधशाळेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ एच. हरिदासन यांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अजून आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गोव्यासह कोंकण आणि महाराष्ट्रात संततधार आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचेच आहेत.
शहरातील एका ट्रॅव्हल एजंटकडे चौकशी केली असता मुंबईहून येणाºया अवघ्याच काही बसेस सकाळी आल्याचे त्याने सांगितले. गोवा मुंबई मार्गावर रोज ५0 ते ६0 बसगाड्या धावतात. महामार्गावर वाटेत जगबुडी नदीला पूर आल्याने पूल वाहतुकीसाठी पूल बंद केला गेला त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे पुराची माहिती आधी मिळाली त्यांनी मुंबईहून पुणेमार्गे गाड्या वळविल्या त्यातील काही गाड्या गोव्यात पोचल्या.
संततधार चालूच राहिल्याने नद्या-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. राजधानी पणजी शहरात दिवसभर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारक मेटाकुटीला आले. रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकल्या. पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी अपघातही घडले. दोन दिवसांपूर्वीचे अंजुणे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. आता आणखी पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढणार आहे.
केपेंत सर्वाधिक पाऊस
राज्यात पावसाचा जोर शुक्रवारी पहाटेपासून सुरु झाला. सकाळी ८.३0 वाजेपर्यंत मागील २४ तासात केपें तालुक्यात सर्वाधिक २६.२ मि. मि, वाळपई तालुक्यात २४ तासात २५.२ मि. मि. पावसाची नोंद झाली. म्हापशात १७.६ मि. मि, काणकोणमध्ये १७ मि. मि, दाबोळी आणि मुरगांवमध्ये प्रत्येकी १0.६ मि. मि, मडगांवात १९.४ मि. मि, सांगेत १९.२ मि. मि, फोंड्यात २४. ४ मि. मि., पणजीत १२.५ मि. मि., जुने गोवेत १३.२ मि. मि., पेडणेत १५.२ मि. मि. पावसाची नोंद झाली.