Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या एका बैठकीत नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. यातच शिंदे गटात गेल्याचा दावा खोटा असून, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असे स्पष्टीकरण गोव्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते जितेश कामत यांनी दिले आहे.
अलीकडेच दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह बारा राज्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर संबंधित नेते अधिकृत नसून, अधिकृत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्र देत आपल्यासोबत असल्याचे सांगितल्याचा खुलासाही ठाकरेंतर्फे करण्यात आला आहे. त्यानंतर आता गोव्यातील शिवसेना नेते जितेश कामत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.
मी एकनाथ शिंदेंना भेटायलाही गेलो नव्हतो
एका व्हायरल पोस्टमध्ये १२ राज्यांच्या शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचा दावा केला जात होता. मात्र मी एकनाथ शिंदेंना भेटायलाही गेलो नव्हतो. जे कोण भेटले, त्याविषयी मला माहिती नाही. माझे नाव त्यात घेऊ नये, कारण त्या व्हायरल फोटोत तर मी कुठे दिसतही नाही, कारण मी तिथे नव्हतोच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पद दिले, मी त्यांच्यासोबतच आहे, असे जितेश कामत म्हणाले.
दरम्यान, या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आणि नेत्यांना महत्त्वाच्या सूचना करत आदेशही दिले. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्याचे आदेश दिले आहेत.