पणजी : गोवा हे देशातील पहिले भिकारीमुक्त राज्य करण्याचा संकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत कचरामुक्त राज्याची हमी देणारा २०१७-१८ चा २०२.४८ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सादर केला. एकूण १६ हजार २७ कोटींचा हा अर्थसंकल्प आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ९.०७ टक्क्यांनी जास्त आहे. राज्यात पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर १५ टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. जीएसटी लागू होताच वाहनांसाठी असलेला प्रवेश कर रद्द करण्याची ग्वाही सुद्धा पर्रीकर यांनी दिली.गेल्या वर्षी अर्थसंकल्पाचा आकार १४ हजार ६९४ कोटी होता. एकूण १० हजार ८७२ कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न आणि १० हजार ६७० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. केंद्रीय निधीत तीनपट वाढ झाली आहे. केंद्रीय करातील गोव्याचा वाटा ३,२२४.६१ कोटी आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत हे प्रमाण २२.४ टक्के आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात पेट्रोलचा दर अनुक्रमे ७२ व ७६ रुपये प्रतिलिटर आहे. गोव्यात आता पेट्रोल साधारणत: ६१ रुपये प्रतिलिटर आहे. पेट्रोलवरील व्हॅट १५ टक्क्यांनी वाढविल्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर ६५ रुपये होणार आहे. १ एप्रिलपासून ही वाढ लागू होईल. त्यामुळे सरकारला ५० ते ६० कोटींचा महसूल मिळेल. (खास प्रतिनिधी)
गोवा होणार पहिले भिकारीमुक्त राज्य
By admin | Published: March 25, 2017 2:04 AM