घोडेगाव : डिंभे धरणातील पाण्याने तळ गाठला असून, धरणात शून्य टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे सिंचनाला व पिण्याला पाणी गेल्याने धरण पूर्ण रिकामे झाले आहे. पाणी सोडण्याच्या योग्य नियोजनामुळे पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली आली. डिंभे धरणाची क्षमता १२.७० टीएमसी असून, १ टीएमसी मृतसाठा आहे. सध्या धरणात १.०३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. धरणातील पाणी खाली गेल्याने डावा, उजवा कालवा अथवा नदीमध्ये पाणी सोडणे पूर्ण बंद झाले आहे. भविष्यात पाऊस लांबल्यास धरणातील मृतसाठ्यातून टॅँकरद्वारे पाणी न्यावे लागेल. त्यामुळे धरण भरण्यासाठी सर्वांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. आंबेगाव तालुक्यातील १०७८५ हेक्टर क्षेत्र डिंभे धरणातील डाव्या कालव्याच्या पाण्यावर २१२४, तर उजव्या कालव्यावर ८६६१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या पाण्यामुळे पूर्वीचा दुष्काळी भाग बागायती झाला आहे. जुन्नर, श्रीगोंदा, कर्जत, कर्माळा, पारनेर या तालुक्यांतील शेतीसुद्धा डिंभ्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. आमच्या भागात पाऊस पडला नाही तरी चालेल; मात्र धरणात पाऊस पडू द्या, असे शेतकरी म्हणू लागले आहेत.
डिंभे धरण झाले रिकामे
By admin | Published: May 30, 2016 1:34 AM