मुंबई - पाच वर्षांपूर्वी देशात लोकशाही होती. त्यावेळी आपलं मत व्यक्त करण्याची मुभा होती. आताची स्थिती सर्वांनाच ठावूक आहे. ईडी, आयबी याचा धाक दाखवल्यामुळे कोणी काहीच बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्राला भगवं करा, पिवळं करा, हिरवं करा किंवा पांढरं करा, पण रोजगाराचं काही तरी पाहा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मोदी सरकारला लगावला. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ज्यांचं पोट तळहातावर होतं, त्यांचा रोजगार बंद झाला. पाच वर्षांपूर्वी काही कमी जास्त असेल, पण त्यावेळी लोकांकडे रोजगार तरी होता. आता कसा रोजगार मिळवून देणार तुम्ही. ज्यांनी नवे घर घेतले, त्यांच्याकडे हप्ते भरायला पैसे नाहीच. सगळ विस्कळीत झालं आहे. आगामी काळात बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय काढा. पाच वर्षांपूर्वी जागतीक पातळीवर मंदी असताना भारतीयांना झळ बसली नव्हती, याची आठवण यावेळी उदयनराजे यांनी करून दिली.
दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली, त्यावर उदयनराजे म्हणाले की, पवार साहेब आणि त्यांचे पुतणे ते पाहुन घेईल. २०१४ मध्ये जनतेने भाजपला बहुमत दिले होते, त्यामुळे तुम्ही काय केलं हे दाखवून द्या. कुणावर वैयक्तीक टीका करण्याची गरज नाही, असा टोला उदयनराजे यांनी मोदींना लगावला. लोकांना दिलेले वचन पाळले की नाही, देशाची स्थिती काय आहे, ते तर सांगा. त्यानंतर लोकं ठरवतील तुम्हाला स्वीकारायचं की नाकारायचं, असं उदयनराजे यांनी सांगितले.
विरोधक आरोप करतात की, आमची दहशत आहे. पण आमची दहशत ही आदरयुक्त दहशत आहे. कुठेही अन्याय होत असेल तर मी धावून जाणारच. सगळे म्हणतात, एमपी म्हणजे 'मेंबर ऑफ पार्लमेंट' पण माझ्यासाठी एमपी म्हणजे मिलीटरी पोलिस, असंही उदयनराजे यांनी सांगितले.