मुंबई – २ महिन्याच्या राजकीय विश्रांतीनंतर पंकजा मुंडे पुन्हा राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. राजकीय ब्रेकनंतर पंकजा मुंडे यांनी राज्यभर यात्रा काढली. परंतु आता पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई झाल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो असं मोठं विधान त्यांनी केले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझ्याविषयी कुणीही अफवा पसरवू नये, जेव्हा मला असा निर्णय घ्यायचा असेल. ईश्वर करो, असा निर्णय घेण्याची वेळ न येवो, कारण विवाहबंधन असते तर संघटनेशी आपले एक बंधन असते. आपण नकळत एकमेकांना वचन, आणाभाका, शब्द दिलेले असतात. आपण विचारधारेवर प्रेम केलेले असते. त्यामुळे असा निर्णय कुणाच्याही आयुष्यात घ्यावा लागेल तर त्याच्यासाठी वेदनादायी असतो. माझ्यासाठी तो प्रचंड वेदना देणारा असेल कारण मी या संघटनेत माझ्या वडिलांना बघितले आहे. माझ्यासाठी हे वेगळे नाते आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ येऊच नये अशी माझी प्रार्थना आहे असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत जेव्हा कधी पंकजा मुंडे निर्णय घेईल तेव्हा मी स्वत: समोर येऊन तुम्हाला सांगेल. त्यामुळे उगाच डोकी लावून कुणी त्यावर बातम्या करू नका, त्यामुळे माझ्या करिअरवर त्याचा परिणाम होतो असंही पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना आवाहन केले. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी हे विधान केले आहे. कारखान्यावरील कारवाईवरून पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अमित शाहांची वेळ मिळाली नाही
दरम्यान, मला अजूनही अमित शाह यांची वेळ मिळाली नाही. शाह व्यस्त असल्याने ही वेळ मिळाली नाही. सध्या निवडणुका आहेत. पण ते जेव्हा वेळ देतील तेव्हा मी भेटेन. माझ्या मनातलं मी सांगणार नाही परंतु माझ्यासोबत जी लोकं आहेत त्यांच्या अस्वस्थतेकडे मी बोलणार आहे. परंतु हे सर्व मी सध्याची राजकीय गणिते बसण्याची आधी बोलले होते. आता तर आणखी राजकीय चित्र बदललं आहे. सत्तेत अजून एक पार्टनर निर्माण झाला आहे. तेव्हाची आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.