लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले ‘गॉड गिफ्ट’ असून तेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला.नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना सध्याच्या राजकीय घडामोडीवर विचारले असता, त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. बावनकुळे म्हणाले, भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढले. त्यामुळे भाजप-शिवसेना महायुतीचेच सरकार महाराष्ट्रात येणार आहे. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते यासाठी प्रयत्न करीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून गेल्या पाच वर्षांत उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी लोकाभिमुख प्रशासन दिले. राज्यातील दुष्काळ यशस्वीपणे हाताळला. इतकेच नव्हे तर मराठा आरक्षणाचा प्रश्नही यशस्वीपणे सोडविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीमध्येच फडणवीस हेच मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री कोण? हा प्रश्नच निर्माण होत नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील.भाजप प्रदेशाध्यक्षपदी आपल्या नावाचा विचार केला जात असल्याबद्दल विचारले असता पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, माझी अशी कुठलीही इच्छा नाही. परंतु आजवर मला पक्षाने जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला. यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.शिवसेनेकडून कुठलीही ‘ऑफर’ नाहीबावनकुळे यांना शिवसेनेची ऑफर असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात त्यांना विचारले असता, बावनकुळे यांनी मात्र अशी कुठलीही ऑफर’ नसल्याचे स्पष्ट केले. मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मला पक्षाने आजवर खूप काही दिले. मान-सन्मान दिला. पक्षामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो. नितीन गडकरी हे मला वडिलांसारखे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावासारखे आहेत. अशा कुठल्याही ‘ऑफर’ मला गळाला लावू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस हे तर 'गॉड गिफ्ट', तेच होणार मुख्यमंत्री : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 7:29 PM
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला मिळालेले ‘गॉड गिफ्ट’ असून तेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास राज्याचे ऊर्जामंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केला.
ठळक मुद्देराज्यात महायुतीचेच सरकार येणार