- पं. शांतारामशास्त्री भानोसे( लेखक नाशिक येथील वैदिक ज्ञान-विज्ञान संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत)
अनादीकालापासून कुंभमहोत्सवाची परंपरा अखंडपणे चालत आली आहे. नाशिकमध्ये येत्या १४ जुलैपासून यंदाच्या सर्वात मोठ्या कुंभमेळ््याला सुरुवात होईल. जवळपास वर्षभर चालणाऱ्या या सोहळ््यास ८० लाखांहून अधिक भाविक तसेच पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे. जगभरात हा कुंभमेळा तसा औत्सुक्याचा विषय असतोच, या पार्श्वभूमीवर कुंभमेळ््याच्या धार्मिक तसेच इतर बाबींवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न. सिंहस्थितेज्ये सिंहार्के नासिके गौतमी तटे।ऋ षिमुनींची तपोभूमी, सिद्धांची योगभूमी, समस्त मानवमात्रासाठी मोक्षभूमी असलेल्या प्रभू रामचंद्रांनी आपल्या पदस्पर्शाने पुनीत केलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याची परंपरा अनादी काळापासून चालत आली आहे. जगातील आद्य वाङ्मय असलेल्या वेदांमध्ये व त्यानंतरच्या भारतीय प्राच्य ग्रंथांमध्ये कुंभपर्वासंबंधी बरेच वर्णन आलेले आहे.वैदिक कुंभपर्व स्वरूपऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात, यजुर्वेदाच्या १९व्या अध्यायात उत्तरार्चिकात व अथर्ववेदाच्या ४थ्या कांडात खालीलप्रमाणे वर्णन आढळते -चतुर:कुंभांश्र्चतुर्धा ददामि क्षीरेण पूर्णां उदकेन दघ्ना ।एतास्त्वां धारा उप यन्तु सर्वा: स्वर्गे लोके मधुमत् पिन्वमाना ।।हे समस्त जनहो, या पवित्र भारतभूमीत चार कुंभपर्वांमुळे (नाशिक, उज्जैन, हरिद्वार व प्रयाग) मनुष्याला सर्व प्रकारचे सुख व समृद्धी मिळते. म्हणून दर १२ वर्षांनी येणाऱ्या या कुंभपर्वात सर्वांनी स्नान, दान करावे, असे वेदांनी सांगितले आहे. शासकीय कर्मचारी वर्गाने व अधिकारी वर्गानेदेखील प्रजेच्या कल्याणासाठी कुंभपर्व महोत्सवात सहभाग घ्यावा, असे सामवेदात सांगितले आहे. बारा राशींना बारा कुंभयोग होत असले तरी चारच कुंभपर्वांचे महत्त्व वेदांनी वर्णन केले आहे.पौराणिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्वदेवदानव संवादे मथ्यमाने महोदधौ। उत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम् ।।पृथिव्यां कुंभयोगस्य चतुर्धा भेद उच्यते । विष्णुद्वारे तीर्थराजेऽवन्त्यां गोदावरी तटे ।।देव व दानवांमध्ये प्राचीनकाळी वारंवार युद्धे होत होती. परंतु अमृत मिळविण्याच्या हेतूने देव व दानव शत्रुभाव विसरून एकत्र आले. त्यासाठी समुद्रमंथन करणे आवश्यक असल्याने मंदार पर्वताची रवी व सर्पराज वासुकीची दोरी करण्यात आली. वासुकीचे मुखाकडे दानव व शेपटीकडे देव होते. अशा या समुद्रमंथनातून १४ रत्ने व अमृतकलश बाहेर आला. अमृतकलशाच्या प्राप्तीसाठी पुन्हा युद्धसंग्राम सुरू झाला व त्या झटापटीत अमृतकुंभातील थेंब या पृथ्वीतलावर पडले. तीच ४ कुंभपर्व स्थाने म्हणजेच नाशिक, उज्जैन, हरिद्वार व प्रयाग. चंद्राने या काळात अमृतकलश सांडण्यापासून रक्षण केले, सूर्याने अमृतकलश फुटू नये म्हणून व देवगुरू बृहस्पतीने दानवांपासून त्याचे रक्षण केले. याच कारणांमुळे या तिन्ही ग्रहांच्या विशिष्ट कालस्थितीत त्या अमृतकुंभातील अमृताचे थेंब पडले, म्हणून या कालस्थितीत वरील चार ठिकाणी कुंभपर्व मानण्याची पौराणिक परंपरा आहे.नाशिक येथील अमृत कुंभपर्वओवीबद्ध गोदा माहात्म्यातील १५व्या अध्यायात खालीलप्रमाणे नाशिक येथे अमृतकुंभ ठेवल्याचे प्रमाण मिळते.बृहस्पती म्हणे निर्जरासी । अमृत न द्या दानवासी ।।ते दिधल्या अमरत्वासी । असुर पावतील वेड्यानो ।।२३।।हे बोल अवघ्या पटले । देव अमृत प्यावया आले।दंडकारण्यामाजी भले । कलश घेऊन अमृताचा ।।२४।।याप्रमाणे चारही ठिकाणांचा विचार करावयाचा झाला तर सर्वप्रथम अमृतकुंभ घेऊन देव दंडकारण्यात पंचवटी, नाशिक येथे आले व अमृतकुंभ ठेवला. देव व दैत्यांमध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथे अमृत वाटप करण्याचे ठरले. त्याप्रमाणे अमृताचे वितरण होताना भगवान विष्णूने मोहिनी अवतार घेऊन दैत्यांना परावृत्त केले. त्यांत राहूचे शीर उडवले. ते सह्याद्रीच्या एका पर्वतावर जाऊन पडले. राहूच्या कंठात असलेल्या अमृताचे जल झाले. त्याच जलातून उगम पावली ती म्हणजे प्रवरा नदी. जिथे शरीर पडले ते गाव म्हणजे राहुरी क्षेत्र. याप्रमाणे कथाभाग पुराणांत आला असल्याने पंचवटीतील दंडकारण्य, नाशिक क्षेत्र हेच अमृतकुंभ ठेवण्याचे व नंतर अमृतबिंदू पडण्याचे ठिकाण ठरले. म्हणून नाशिकच्या स्नानाला ‘कुंभस्नान’ म्हणतात, तर इतर वेळी १३ महिन्यांपर्यंत गोदावरीत उगमापासून संगमापर्यंतच्या स्नानाला ‘सिंहस्थस्नान’ असे म्हणतात. नाशिकला पर्वणीच्या दिवशी करावयाच्या स्नानाला सिंहस्थ कुंभपर्व स्नान किंवा शाहीस्नान असे म्हटले जाते. याच स्नानाचे महत्त्व अधिक आहे. ज्यांना नाशिकमधील कुंभस्नान करण्यास जमत नसेल त्यांनी इतर ठिकाणी जिथे कुठे गोदावरी नदी असेल तिथे स्नान करावे. त्याचेही पुण्य आहे. त्यानंतर इतर ३ ठिकाणी अमृतबिंदू पडले. ती ठिकाणे म्हणजेच उज्जैन, प्रयाग व हरिद्वार. तेथून देवदेवता स्वर्गात गेल्याचे उल्लेख पुराणांत मिळतात. हाच अमृतकुंभ ठेवण्याचा किंवा अमृत सांडण्याचा क्रम आहे. म्हणून नाशिकचे महत्त्व अधिक आहे.सिंहस्थ कुंभपर्वाचे माहात्म्यहरिद्वारे कुंभयोगे मेषार्के कुंभगे गुरौ ।प्रयागे मेषस्थेऽज्ये मकरस्थे दिवाकरे ।।उज्जयिन्यां च मेषाऽर्के सिंहस्थे च बृहस्पतौ ।सिंहस्थितेज्ये सिंहार्के नासिके गौतमी तटे ।।सुधाबिंदु विनिक्षेपात् कुंभपर्वेति विश्रुतम् ।।स्कंदपुरातील वरील वचनानुसार कुंभ राशीत गुरू व मेष राशीस सूर्य असताना हरिद्वार येथे, मेषेचा गुरू व मकरेचा सूर्य असताना प्रयाग येथे, सिंहेचा गुरू व मेषेचा सूर्य असताना उज्जैन येथे, सिंह राशीचा गुरू व सिंह राशीचाच सूर्य असताना श्री क्षेत्र नाशिक पंचवटी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. जनस्थाने पंचवट्यां सिंहस्थे च बृहस्पतौ ।दक्षिणा गौतमीपुण्या सेवनीया प्रयत्नत: ।।स्कंदपुरातील वरील प्रसिद्ध वचनानुसार गंगेच्या उगमासंबंधी कथा जेव्हा सुरू होते व ब्रह्मांड पुराणात १०५ अध्यायांमधून सविस्तर वर्णनास सुरुवात होते. ती कथा अशी- गौतम ऋषींच्या हातून गौहत्त्येचे पाप घडल्याने प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या केली व भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर गंगेस भूमंडलावर जाण्यास सांगितले. तेव्हा गंगा भूमीवर येण्यास तयार नसल्याने शंकराने जटा आपटल्या व गंगेस भूमीवर येण्यास भाग पाडले. त्यावेळी पृथ्वीवरील सर्व नद्या व सर्व देवांनी गंगेस कबूल केले की, तुझ्यावर होणारा पापसंचय दूर करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्यात आम्ही श्री क्षेत्र नाशिकच्या दक्षिणवाहिनी होत असलेल्या ठिकाणी विशेष रूपाने वास्तव्य करण्यास येऊ. म्हणून सिंहस्थ कुंभमेळ्याचे महत्त्व श्री क्षेत्र नाशिक येथे अगाध आहे.नासिकंच प्रयागंच पुष्करं नैमिषं तथा ।पंचमंच गयाक्षेत्रं षष्ठं क्षेत्रं न विद्यते।।पृथ्वीतलावर जी ५ महाक्षेत्रे सांगितली आहेत, त्यांत नाशिकचा प्रामुख्याने उल्लेख येतो. अशा या पवित्र सिंहस्थ कुंभमेळ्यात स्नान, दान, जप, श्राद्ध इत्यादी कर्मे केल्याने मानव अनेक पापांपासून मुक्त होतो.सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नानआगामी सिंहस्थ कुंभमेळा हा शके १९३७ आषाढ वद्य त्रयोदशी बुधवार, १४ जुलै २०१५ रोजी प्रारंभ होत आहे व दि. १४ आॅगस्ट २०१६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याची समाप्ती होत आहे. या वर्षभरात स्नानाचे पुण्य नित्य आहेच. परंतु साधू-महंतांच्या विविध आखाड्यांचे मिरवणुकीने शाहीस्नाने श्रावण व भाद्रपद महिन्यात ३ महापर्वकालाच्या निमित्ताने खालीलप्रमाणे असतील.