नाशिक : गोदाकाठी शनिवारी कोपर्डीतील विद्यार्थिनीवरील अत्याचार व हत्येच्या विरोधात मराठा समाजाचा विराट मूकमोर्चा काढण्यात आला. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा, मराठा समाजास आरक्षण आणि अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चाने आजवरच्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे विक्रम मोडीत काढले. शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देणाऱ्या या मोर्चात महिला व विद्यार्थिनींचा सहभाग लक्षवेधक ठरला. तपोभूमी असलेल्या तपोवनातील साधुग्रामच्या जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज प्रवेशद्वारापासून मोर्चाला सकाळी १०.४० वाजता आरंभ झाला. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करत आणि हाती भगवे ध्वज आणि घोषणाफलक घेत मोर्चात सहभागी झालेला विराट समाज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. त्यानंतर गोल्फ क्लब मैदानावर दुपारी श्वेता भामरे या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत असलेल्या निवेदनाचे जाहीर वाचन केले. विद्यार्थिनींनी निवेदनाद्वारे मागण्यांचे जाहीर वाचन केले. राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसहा मुलींच्या हस्ते सात पानी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना देण्यात आले. साक्षी चव्हाण हिने जिल्हाधिकाऱ्यांसमोर निवेदन वाचून दाखविले. प्रगती पगार, ऋतुजा लोणे, रुचिका ढिकले, तृप्ती कासार, काजल गुंजाळ या विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.
गोदाकाठी मराठा समाजाचा महामोर्चा
By admin | Published: September 25, 2016 2:14 AM