नाशिक/नगर/कोल्हापूर/सोलापूर : मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी संध्याकाळपर्यंत धुव्वाधार पाऊस झाला. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच गोदावरी नदीला पूर आला. त्यामुळे नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ८ हजार क्सुसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ते मराठवाड्याकडे झेपावले आहे.
नाशिक जिल्ह्यात नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात १६० मि.मी., पेठ येथे १०१ मि.मी., इगतपुरीत रविवारी ४६ मि.मी., सिन्नरला ५५, तर नाशिक तालुक्यात ९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता पंचगंगा नदी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडली. जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, पंचगंगेसह भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, वारणा या प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यावरील १८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूकही बंद झाली.सांगलीत चांदोली (ता.शिराळा) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ तासांत तब्बल १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सातारा जिल्ह्यात कोयना धरणात रविवारी सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत पाणीसाठ्यात जवळपास पाच टीएमसीने वाढ झाली आहे. साताºयातील कास तलाव भरला आहे.
मालगाडीचे इंजिन घसरलेइगतपुरीहून मुंबईच्या दिशेने जाणाºया मालगाडीचे इंजिन रुळावरून घसल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घसरलेले इंजिन हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
उजनीमध्ये आठ दिवसांत ३ टक्के पाणीउजनी धरणामध्ये गेल्या आठ दिवसांत २ टीएमसी पाणी आले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ व भीमाशंकर परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे ११ हजार ९४७ क्युसेकने पाणी येत होते. अजूनही उजनी धरणात ६१७५ क्युसेकने दौंडमधून विसर्ग सुरूच आहे. पाण्याअभावी आषाढी वारीसाठी यंदा उजनीतून पाणी सोडण्याचे नियोजन रद्द करण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगात पाऊसअहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. मुळा खोºयातील कोथळे आणि शिरपुंजे येथील लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बलठण येथील छोटे धरण भरण्याच्या मार्गावर आहे. मुळा, भंडारदरा पाणलोटातील ओढ्या नाल्यांनाही पूर आला आहे. मुळा नदीला पूर आला आहे.