महाराष्ट्र सरकारने विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केले, परंतु मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा जाहीर केली. २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको करण्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आपल्या मागण्यांबाबत २२ व २३ फेब्रुवारी या दोन दिवसांची मुदत दिली. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून प्रत्येक गावात दररोज सकाळी १०.३० ते दुपारी १ किंवा संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत एकाच वेळी रास्ता रोको करण्याचा निर्णय झाला. कोणीही जाळपोळ करायची नाही. आंदोलनाचा दहावी-बारावीच्या परीक्षांवर परिणाम होता कामा नये, असेही जरांगे यांनी सांगितले.
मनोज जरांगेंच्या या भूमिकेवर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगेना काही कळत नाही. विनाकारण गावबंद करा म्हणताय. वयस्कर लोकांना उपोषणाला बसवताय. सर्वबाबी सरकार सकारात्मक विचार करताय, परंतु गैरसमज निर्माण करत आहे. उपोषणाबाबत समाजातील लोकांना विचारले नव्हते, श्रेयवादासाठी स्वतःहून हे उपोषणाला जाऊन बसले, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. बारावी परीक्षा सुरू आहेत, हे रस्ते बंद करतात. त्यांना जनतेसाठी काही वाटत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे रस्त्यांवर उतरा सांगतात. वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाल्यास पोलिसांनी मनोज जरांगे यांना कारणीभूत धरावे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.
...तर वृद्धांनीही उपोषण करावे- मनोज जरांगे
२९ तारखेपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी नाही केली, तर १ मार्च रोजी राज्यातील वृद्ध महिला व पुरुष यांनी आमरण उपोषणाला बसायचे आहे. उपोषणादरम्यान एकाचाही जीव गेला, तर त्यास सरकार जबाबदार असेल. तसेच ३ मार्चला पूर्ण राज्यात जिल्ह्याच्या वतीने एकाच ठिकाणी एकच रास्ता रोको करायचा, असेही जरांगे यांनी म्हटले.
लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलावे- मनोज जरांगे
३ मार्चपासून जिल्हाजिल्ह्यात शांततेत रास्ता रोको होणार आहेत. लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतील. सकाळी ११-१२ दरम्यान रस्ता रोको होतील. ३ मार्चला लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्न कार्य असणाऱ्यांनी दुपारच्या लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी करावा असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे आवाहन लोकांना केले आहे.