लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधिमंडळात शिवसेना हाच पक्ष आहे. एका पक्षात दोन व्हीप असू शकत नाहीत. शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून, भरत गोगावले हे प्रतोद आहेत. ठाकरे गटाचे आमदारही शिवसेनेचे असून, गोगावले यांचा व्हीप त्यांना लागू होईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नार्वेकर यांनी व्हीपबाबतची शंका दूर केली. मूळ राजकीय पक्षाबाबत निर्णय दिला आहे. व्हीप म्हणून ज्या भरत गोगावले यांना मान्यता दिली आहे, त्यांचाच व्हीप दोन्ही गटांना लागू होईल. ज्यावेळी नरहरी झिरवळ यांनी सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांना निवडले, त्यावेळी २१ जून २०२२ रोजी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचेच पत्र होते, एकनाथ शिंदे यांचे नव्हते. एकच राजकीय पक्ष असल्याचे वाटल्याने त्यांनी प्रभू आणि चौधरी यांची निवड केली.
...म्हणून १९९९ च्या घटनेचा आधार
- मूळ राजकीय पक्ष ठरविल्यानुसार व्हीप कुणाचा हे ठरवता येत नव्हते. त्यामुळे मी सर्वप्रथम राजकीय पक्ष कुणाचा, हे ठरवले. हा निर्णय देत असताना शिवसेनेच्या संविधानाचा विचार करावा लागला.
- ठाकरे गटाने २०१८चे दिलेले संविधान ग्राह्य धरायचे की, १९९९ मधील शिंदे गटाने दिलेले संविधान ग्राह्य धरायचे, हा प्रश्न महत्त्वाचा होता.
- कोर्टाने स्पष्ट सांगितले होते की, दोन पक्षांनी वेगवेगळ्या घटना दिल्या तर निवडणूक आयोगाने दिलेल्या घटनेचा आधार घ्यावा लागतो. आम्ही निवडणूक आयोगाकडे असणारी अधिकृत प्रत मागवली. सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरनुसार १९९९ ची घटनाच ग्राह्य धरावी लागली.
कायदेशीर सल्ला घेऊ : सुनील प्रभू
व्हीप प्रामुख्याने अधिवेशन काळात लागू असतो. सध्या अधिवेशन नाही. त्यामुळे व्हीपबाबत तोपर्यंत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आमदार सुनील प्रभू यांनी दिली.
काय निर्णय घ्यायचा हे ठरवू: गोगावले
शिवसेना म्हणून माझा व्हीप लागू झाला आहे. त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाने व्हीप न पाळल्यास काय निर्णय घ्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संंबंधितांशी बोलून ठरवू.
अध्यक्षांनी पहिल्यांदा राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवावे आणि त्यानंतर प्रतोद, विधिमंडळ नेत्यांची निवड करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच मी माझा निकाल दिला आहे, असेही राहुल नार्वेकर यानी स्पष्ट केले.