पुणे : यंदा मान्सून चांगला बरसेल, अशी आनंददायक बातमी असली तरी त्याआधी उन्हाळ््याच्या अधिक दाहक झळा सोसाव्या लागणार आहेत. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढच्या चार दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. देशभरात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढणार असल्याचे यापूर्वीच हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्याचाच काहीसा अनुभव एप्रिलच्या पहिल्याच दिवसापासून येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागाला तीव्र उष्णतेच्या लाटेचा फटका बसू शकतो. एप्रिल ते जून या काळात देशभरात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र राहील, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) उपमहासंचालक डॉ. शिवानंद पै यांनी सांगितले. १९०१ पासूनचा उन्हाळ्याचा इतिहास पाहता २०१५ या वर्षी तिसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. यंदा त्यापेक्षा अधिक विक्रमी तापमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे. असा घेतला जातो अंदाज...केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी आयएमडीच्या पुण्यातील कार्यालयाला भेट दिली. समुद्रातील वातावरण आणि वातावरण बदलासंबंधी मॉडेलचा अभ्यास करून उन्हाळ्याच्या तीव्रतेचा अंदाज दिला जातो. याच मॉडेलच्या आधारावर आयएमडीने दर पाच दिवसांनी उन्हासंबंधी सावधगिरीचा इशारा देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांपर्यंत योग्य मानला जाणार आहे.कमाल तापमान : कोल्हापूर (३८.७), नाशिक (३७.८), सांगली (४०.९), सोलापूर (४१.५), उस्मानाबाद (४०.१), औरंगाबाद (३८.४), परभणी (४१.७), अकोला (४१.२), नागपूर (४०.५).
यंदा उन्हाळा असणार अधिक दाहक
By admin | Published: April 02, 2016 4:06 AM