शेगांव, दि. २३ - लग्नात आलेल्या व-हाडीपैकी नवरदेवाची मित्रमंडळी लग्न मंडपाजवळील रेल्वे रूळावर लघुशंकेसाठी गेली होती. यावेळी नवरदेवाच्या वरातीमधील डीजे सुरू होता. या आवाजामुळे मध्य रेल्वेमार्गावरील शेगांव स्थानकावर नागपूरकडून मुंबईकडे जाणा-या रेल्वेचा आवाज या तिघांना आला नाही त्यामुळे रेल्वेच्या धडकेत यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर आहेत.
खामगांव तालुक्यातील अंत्रज येथील गोंडूजी सोळंके यांच्या मुलाचे लग्न शेगांव येथील ताडपू-यात राहणारे प्रकाश रामकृष्ण राठोड यांच्या मुलीशी शनिवारी दुपारी ११ च्या सुमारास झाले. या लग्न सोहळ्याकरीता नवरदेवाचे मित्र शेलोडी येथील बाबुलाल गोलनदास सोळंके वय ४० सहदेव तुळशीराम वाघ रा.अंत्रज व एक मित्र असे तिघे आले होते.
लग्न मंडपाजवळच रेल्वे लाईनवर हे तिघेजण लघुशंकेसाठी गेले असता लग्न सोहळ्यातील डिजेमुळे या तिघांना भरधाव वेगाने आलेल्या रेल्वेगाडीचा आवाज ऐकु आला नाही. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत बाबुलाल सोळंके हे जागीच गतप्राण झाले तर सहदेव तुळशीराम वाघ यांचे कमरेचे हाड मोडले व त्यांच्या डोक्याला मार लागला, त्यांना सामान्य रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असुन त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.प्रेमचंद पंडीत यांनी सांगितले. तर तिस-या मित्राला जास्त मार लागल्याने त्यास अकोला येथे परस्पर भरतीसाठी नेण्यात आले असुन त्याची प्रकृती चिंताजनक आहे.