Uddhav Thackeray On NDA : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी महायुतीमधून बाहेर पडत महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आजारी होते, पण तरीही त्यांनी निवडणुकीच्या काळात मेहनत घेतली, असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे आता पुन्हा उद्धव ठाकरे एनडीएसोबत जाणार का प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आता उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांच्यासमोरच उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि पृ्थ्वीराज चव्हाण यांच्यासमोर बसून हो सांगू का असं म्हटलं. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
भविष्यात उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींसोबत दिसतील असे रवी राणा म्हणाल्याचे पत्रकारांनी त्यांना सांगितले. यावर उद्धव ठाकरे यांनी केवळ ठीक आहे जाऊदे, असं उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी नेहमी अशी चर्चा का होते असा सवाल केला. यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. बरं ठीक आहे मला समजा त्यांच्यासोबत जायचं आहे. पण आता यांच्यामध्ये बसून तुम्हाला हो सांगू का? असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले.
मोदी सरकार किती दिवस चालेल हा प्रश्न आहे - उद्धव ठाकरे
"भाजपचा अजिंक्यपणा किती फोल आहे हे जनतेने दाखवून दिलं. जनतेला सत्य कळालं आहे. ही लढाई विचित्र होती. पण संविधान वाचवण्यासाठी ही लढाई होती. देशभक्त आणि संविधान प्रेमी लोकांनी मविआ आणि इंडिया आघाडीला कौल दिला. हा विजय अंतिम नाही. आता मोदी सरकार किती दिवस चालेल हा प्रश्न आहे. दिल्लीतील कडबुळे नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा प्रश्न आहे. देशातली जनता निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली.येणारी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आम्ही कोर्टात आव्हान दिलं आहे. त्याच्या निकालाची आम्हाला अपेक्षा आहे. सुप्रीम कोर्टाने त्या बद्दल नाराजी व्यक्त केली," असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.