जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाउनमुळे सुवर्णबाजार बंद असला तरी मल्टि कमोडिटी एक्स्चेंज सुरूच असल्याने सोने-चांदीत गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे या मौल्यवान धातूंचे दर लॉकडाउन काळातही वाढत आहेत. कमोडिटी बाजारात सोने-चांदीने नवी उच्चांकी गाठत सोन्याने ४४ हजार ६०० तर चांदीने ४६ हजार रु पयांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे आठवडाभरात सोन्याच्या दरात ५ हजार ६०० रु पये प्रतितोळा अशी वाढ झाली आहे.सोने-चांदीच्या दरावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा परिणाम होत असतो. चीनमधून जगभरात पोहोचलेल्या कोरोनाचाही परिणाम गेल्या महिनाभरापासूनच होत आहे. कोरोनामुळे गेल्या महिन्यात सुवर्ण बाजार अस्थिर होऊन दर कमी-जास्त होत होते. त्यानंतर लॉकडाउनमुळे सुवर्णपेढ्या बंद आहेत. असे असले तरी मल्टि कमोडिटी एक्स्चेंज सुरूच आहेत. कोरोनामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये अनिश्चितता निर्माण झाल्याने सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. यात दुकान बंद असले तरी कमोडिटी बाजारात सौदे सुरू आहे. कोरोना विषाणू पसरण्यापूर्वी सुवर्ण व्यावसायिकांनी जे सौदे करून ठेवले आहेत, त्यांची मुदत संपत आली की, त्यांना खरेदी अथवा विक्र ी करावी लागते. या सौद्यांची मुदत संपत आल्याने मल्टि कमोडिटी बाजारात मोठा फायदा घेतला जात आहे.सोन्यात ५६०० रु पयांची वाढमागणी वाढत असल्याने गेल्या आठवड्यात मल्टि कमोडिटी बाजारात ३९ हजार रु पये प्रती तोळा असलेल्या सोन्याचे दर बुधवारी ४४ हजार ६०० रु पये प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे चांदीचेही दर ४० हजारावरून ४६ हजार रु पये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. कमोडिटी बाजारात एवढे दर असतील तर ज्या वेळी सुवर्णबाजार सुरू होईल, त्यावेळी हे दर अधिकच राहण्याचे संकेत दिले जात आहेत.सुवर्णपेढ्या बंद असल्या तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे व्यवहार सुरू असून, कमोडिटी एक्स्चेंजमध्ये सौदे होत आहेत. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीत गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे मागणी वाढली आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन, जळगाव
लॉकडाउनमध्येही सोने-चांदीला झळाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:28 AM