लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/जळगाव : दिवाळीतील सर्व मुहूर्तावर यंदा मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी तर झालीच, पण धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन तसेच पाडवा व भाऊबीज या निमित्ताने सोने-चांदीला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. यामुळे राज्यात दोन हजार कोटींची, तर जळगावात ७० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते. देशभरात जळगावातील सोने प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते.
नवरात्रीपासून सुवर्ण पेढ्या गजबजून गेल्या. तेव्हापासून अद्यापही गर्दी कायम आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदीस वेग आला. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मोठी खरेदी झाली. पुन्हा पाडवा व भाऊबीजेला खरेदीत आणखी भर पडली. लक्ष्मीपूजनापेक्षा पाडव्याला सोने खरेदीला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जेवढी गर्दी झाली, त्यापेक्षा अधिक गर्दी पाडव्याला झाली.
सोन्याचा भाव गेला ५१ हजारांच्या वरn जळगावातील १५०च्यावर सुवर्णपेढ्यांमध्ये दिवाळीत ७० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. धनत्रयोदशीला सोन्याचे भाव ५१ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर होते. हा मुहूर्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले व लक्ष्मीपूजनाला ते ५१ हजार ५०० तोळ्यावर पोहचले.
n चांदीचेही भाव धनत्रयोदशीला ६३ हजार ५०० रुपयांवर होते, ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आले. त्यानंतर पाडवा व भाऊबीजेला याच भावावर खरेदी झाली. राज्यात जवळपास दोन हजार कोटी रुपयांची उलाढाल केवळ सोने-चांदीत झाल्याचा अंदाज आहे.
गुंतवणूकदारांची दिवाळी
कोरोनावरील प्रतिबंधक लसीच्या मात्रा ९५ टक्के लोकांवर यशस्वी ठरल्याचे मॉडर्ना या अमेरिकी कंपनीने जाहीर करताच जगभरातील भांडवली बाजारांनी घेतलेल्या उसळीचे प्रतिबिंब मुंबई भांडवली बाजारातही उमटले. दीपावलीच्या सुट्टीनंतर मंगळवारी बाजारातील व्यवहार सुरू होताच निर्देशांकाने मोठी झेप घेत ४४ हजाराचा टप्पा पार केला. ४४,१६१.१६ ही तेजीची उंची गाठल्यानंतर निर्देशांक दुपारी ४३,९५२.७१ अंकांवर स्थिरावला. मंगळवारी एकूण ३१४.७३ अंकांनी निर्देशांक वधारला.
दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांची वाढलेली क्रयशक्ती, देशात घटत असलेली कोरोनारुग्णांची संख्या आणि पूर्वपदावर येत असलेली जागतिक बाजारपेठ अशी सर्व अनुकूल परिस्थिती असताना मॉडर्नाच्या गुडन्यूजमुळे मंगळवारी भांडवली बाजारात चैतन्य संचारले. निर्देशांकाने ४३,६३८ ही आपली आधीची पातळी सोडून ४४,१६१.१६ ही नवी उच्चांकी पातळी गाठली. धातू, औद्योगिक, बँकिंग व वित्त क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना जादा मागणी आली. टाटा स्टीलचे समभाग सहा टक्क्यांनी वधारले. दिवसअखेरीस निर्देशांक ४३,९५२.७१ अंकांवर स्थिरावला.दरम्यान, निफ्टीनेही १२,९३४ हा नवा उच्चांक गाठला. बाजारातील व्यवहार बंद होतेवेळी १२,८७४.२० अंकांवर निर्देशांक स्थिरावला. निफ्टी निर्देशांकात ९३.९५ अंकांची वाढ नोंदवली गेली.