पुणे : सोन्याचा शर्ट, रस्त्यावर धावणारी चांदीची बुलेट आणि यानंतर सोन्याच्या गणेशमूर्तीच्या निर्मितीमुळे रांका ज्वेलर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चिंचवड येथील एका गणेशभक्ताच्या मागणीनुसार तब्बल साडेपाच फुटांची सोन्याची गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. देशातील ही सर्वांत मोठी सोन्याची गणेशमूर्ती असल्याचा दावा केला जात आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी आत्तापासूनच गणेशभक्तांची गर्दी होत आहे.गणेशोत्सव जवळ आल्याने शहरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या आकर्षक गणेशमूर्ती पाहायला मिळत आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीपासून दगडूशेठ, लालबागचा राजा, जय मल्हार अशा विविध प्रकारच्या प्रतिकृती दिसून येत आहेत. घरातील बालगोपालांपासून सार्वजनिक गणेश मंडळांपर्यंत सर्वच जण गणेशाच्या स्वागताच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत. याच वेळी रांका ज्वेलर्सच्या पिंपरी येथील दालनातील ही सोन्याची मूर्ती चर्चेचा विषय ठरला आहे. मूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी या सोन्याच्या बाप्पांसोबत सेल्फीही काढला. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर खरेदीदार मूर्ती घेऊन जाणार असल्याचे रांका ज्वेलर्सचे संचालक तेजपाल रांका यांनी सांगितले.मूर्ती घडविण्यासाठी फ्युजन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. मूर्तीच्या आतील बाजूला वेगळा धातू वापरून बाह्य भागात २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. एका गणेशभक्ताचा नवस पूर्ण झाल्याने त्याने सोन्याची मूर्ती तयार करण्याची आॅर्डर दिली होती. त्यानुसार ५ महिन्यांत ही मूर्ती तयार करण्यात आल्याचे तेजपाल रांका यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सोन्याचे बाप्पा!
By admin | Published: August 31, 2016 1:11 AM